सातारा बँकेच्या राजकारणात ‘वरिष्ठां’च्या बैठकांनी वाढवली उत्सुकता; रामराजे, शिवेंद्रसिंहराजे, मकरंद पाटील यांची खलबतं
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच जिल्ह्याच्या राजकारणातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठींना अचानक वेग आला आहे. सोमवारी जिल्हा बँकेच्या चौथ्या मजल्यावर झालेली वरिष्ठ नेत्यांची दीड तासांची बैठक आणि त्यानंतर जलमंदिर पॅलेसवर शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांच्यात झालेली सुमारे तासभराची चर्चा यामुळे बँकेच्या निवडणुकीचे राजकीय गणित पुन्हा चर्चेत आले आहे.
बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील आणि बँकेचे संचालक रामराजे नाईक-निंबाळकर एकाच ठिकाणी आले. चौथ्या मजल्यावरील या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली, याचा तपशील अधिकृतपणे समोर आलेला नाही. मात्र, बँकेच्या २१ संचालकांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे राजकीयदृष्ट्या लक्ष वेधले गेले आहे. याचदरम्यान शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पुढील निर्णय होतील, असे स्पष्ट केले.
महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा करूनच पुढील दिशा ठरविली जाईल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल होत असले तरी अंतिम राजकीय समीकरण अद्याप आकाराला आलेले नसल्याचे संकेत मिळत आहेत.
अर्जांनी समीकरणांची सुरुवात
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यंदा सुरुवातीपासूनच प्रमुख राजकीय व्यक्तींच्या उमेदवारीकडे लक्ष लागले आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी गृहनिर्माण मतदारसंघातून अर्ज दाखल करून निवडणूक प्रक्रियेत आपली उपस्थिती नोंदविली. त्यानंतर रामराजे नाईक-निंबाळकर यांनी प्रक्रिया उद्योग मतदारसंघातून अर्ज दाखल केला.
11 जागा बिनविरोध
गेल्या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातील ११ जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित दहा जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यामुळे यंदा अर्ज दाखल करण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच प्रमुख नेत्यांच्या हालचाली सुरू झाल्याने पुढील काही दिवसांत कोणत्या मतदारसंघात कोणाचे नाव पुढे येते, याकडे लक्ष लागले आहे.
जलमंदिरवरची भेट ठरली चर्चेचा विषय
बँकेतील बैठकीनंतर शिवेंद्रसिंहराजे यांनी सुरुची निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी जलमंदिर पॅलेस येथे जाऊन उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. या चर्चेचा तपशील समोर आलेला नसला तरी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना दोन्ही राजांची झालेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.
दरम्यान, बँकेतील विद्यमान अनुभवी संचालकांना पुन्हा संधी द्यायची की काही मतदारसंघांत नवीन चेहऱ्यांना पुढे आणायचे, यावरही पुढील चर्चांमध्ये खल होण्याची शक्यता आहे. शिवेंद्रसिंहराजे यांनीही अंतिम निर्णयापूर्वी आणखी चर्चा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
राजकीय चर्चांना वेग येण्याची शक्यता
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अद्याप अवधी असल्याने पुढील काही दिवसांत बैठका, भेटीगाठी आणि राजकीय चर्चा यांना वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारी झालेल्या बैठकांमधून कोणता राजकीय संदेश बाहेर पडतो आणि त्याचे प्रतिबिंब उमेदवारी अर्जांमध्ये कसे उमटते, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.






