Farmers block road in Kolhapur and Marathwada against Shakti Peeth Highway
कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शक्तीपीठ महामार्ग हा महत्त्वकांशी प्रकल्प मानला जातो. या मार्गाला सुरुवातीपासून विरोध करण्यात आला होता. मात्र तरी देखील सरकार त्यांच्या निर्णयावर ठाम आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरु झाली असून त्या विरोधात आता शेतकऱ्यांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आज शक्तीपीठ महामार्गाविरोधात रास्ता रोको केला आहे. कोल्हापूरसह मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
शक्तीपीठ महामार्गाविरोधात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी शक्तीमार्गाविरोधातील आंदोलनचे नेतृत्व केले आहे. शक्तीपीठ महामार्गाविरोधात सर्व जिल्ह्यांमध्ये महामार्ग रोखून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारो शेतकरी, शेतकरी संघटना या रस्त्यावर उतरल्या होत्या. कोल्हापुरातील आंदोलनात शेतकरी नेते राजू शेट्टी स्वत:त सहभागी झाले. शक्तीपीठ महामार्ग आमच्यावर लादू नका, अशा तीव्र भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. कपाळाच्या कुंकवाएवढी जागा देखील देणार नाही असा आक्रमक पवित्रा महिला शेतकऱ्यांनी घेतला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कोल्हापूरसह शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापुरात देखील शेतकरी आक्रमक झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, यावेळी मोहोळ पंढरपूर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग शेतकयांनी रोखला आहे. वारीच्या काळात महत्वपूर्ण असलेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग शेतकयांनी रोखल्याने वाहनांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे राज्यभरातून अनेक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्याच्या विधीमंडळाचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. यामध्ये देखील कॉंग्रेस आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेमध्ये शक्तीपीठ महामार्गाबाबत भूमिका मांडली आहे. यावेळी सतेज पाटील यांनी आज कृषीदिनी दुर्दैवाने 12 जिल्ह्यात शेतकऱ्यांचे गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन सुरू आहे. आता वित्त आणि नियोजन विभागाने या प्रकल्पावर आक्षेप घेतला आहे. राज्यावरील 18% व्याजाची मर्यादा आता 25 टक्क्यांवर जाण्याची भीती आहे. हे एवढे सगळे कोणत्या कंत्राटदारांसाठी चालू आहे ? असा प्रश्न विचारून गरज नसलेला हा महामार्ग रद्द करण्यासाठी शासनाने ठोस अशी भूमिका जाहीर करावी, अशी भूमिका आमदार सतेज पाटील यांनी घेतली.
कोल्हापूरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त
शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला हा शक्तीपीठ महामार्ग यामध्ये हजारो हेक्टर सुपीक शेती जमिनी नष्ट होणार आहेत. शेतकऱ्यांनी या विरोधात आवाज उठवून आंदोलनाचे हत्यार उपसून विधानसभा निवडणुकीवेळी हा वादग्रस्त महामार्ग रद्द करण्याची घोषणा त्या वेळच्या सरकारने केली होती. पण राज्यात पुन्हा सरकार येताच हा शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे . दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी पोलिसांना बळाचा वापर करू नये अन्यथा जशास तसे उत्तर देऊ असा गर्भित इशारा दिला होता .तर नोटीसा बजावून देखील राजू शेट्टी, ऋतुराज पाटील, विजय देवणे हे शेतकऱ्यांच्यासाठी रस्त्यावर उतरले होते.