उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना छळले असल्याचा खासदार नारायण राणे यांनी दावा केला (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्याचे राजकारण सध्या ठाकरे बंधूच्या भोवती फिरत आहे. मराठी अस्मिता आणि हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. महायुती सरकारने याबाबत आदेश रद्द केले असले तरी देखील दोन्ही नेत्यांची एकत्रित सभा होणार आहे. सर्व मराठी माणसांना सहभागी होण्याचे आवाहन देखील ठाकरे बंधूंनी केले आहे. एकीकडे सर्वांचे लक्ष विजयी सभेकडे लागलेले असताना भाजप खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. नारायण राणे हे पूर्वी शिवसेनेमध्ये असल्यामुळे त्यांनी राज ठाकरेंना दिलेल्या त्रासाचा देखील उल्लेख केला आहे.
भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यांचा रोष व्यक्त केला आहे. नारायण राणे यांनी लिहिले आहे की, “उद्धव ठाकरे सन्माननीय राज जी ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्याने परत या असे म्हणून प्रयत्न करीत आहेत. मला आठवते याच उद्धव ठाकरेंनी राज जी ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटतं ? आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत,” असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी लिहिले आहे की, “राज ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसविले याने सत्ता घालविली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे. मराठी माणसाने व हिंदूंनी याला घरी बसविले. गेलेले परत मिळवण्याची धमक व क्षमता उद्धव ठाकरे मध्ये नाही ! जो बूंद से गई वो हौद से नहीं आती !” अशा शब्दांत नारायण राणे यांनी घणाघात केला आहे.
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 30, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे याचे मराठीचे प्रेम बेगडी, राजकीय व स्वार्थापोटी आहे. मुख्यमंत्री असताना हे प्रेम कुठे गेले होते? मराठी माणसाच्या नोकरी, धंदा व पोटाच्या प्रश्नासाठी काय केले? मराठीच्या नावावर केवळ आपले कल्याण करून घेतले. मराठी माणसाच्या व मराठी भाषिकांच्या कल्याणाचे काय? महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये मराठी माणसाची टक्केवारी १८ टक्केपर्यंत खाली आली याला जबाबदार कोण? मराठी बद्दल इतकेच प्रेम होते तर मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवले? सरकारने दोन जीआर रद्द केले म्हणून विजयी मेळावा काढणे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असेच म्हणावे लागेल,” असा टोला भाजपचे खासदार नारायण राणे यांनी लगावला आहे.