
फोटो सौजन्य - Social Media
यंदाच्या खरीप हंगामात खामगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांचा मोठा फटका बसला आहे. लाखो रुपयांचा खर्च करून सोयाबीनची पेरणी केल्यानंतरही अनेक शेतांमध्ये उगवण झाली नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेक ठिकाणी ८० ते १०० टक्के उगवण न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून प्रमाणित असल्याचे सांगून विक्री करण्यात आलेले बियाणे खरेदी केले होते. पावसाची परिस्थिती अनुकूल असतानाही पीक उगवले नसल्याने मेहनत आणि मोठा आर्थिक खर्च वाया गेला. त्यामुळे कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा पेरणीसाठी निधी उभारण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
या प्रकारानंतर बाधित शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली असून, संबंधित बियाणे उत्पादक कंपन्या आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. शेतकरी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई, मोफत बियाणे आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, तालुका कृषी अधिकारी सुनील पवार यांनी ज्या शेतांमध्ये उगवण झाली नाही, त्या शेतकऱ्यांनी तात्काळ कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. प्रत्येक तक्रारीची शहानिशा करून पंचनामे सुरू करण्यात आले असून, बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. तपासणीत दोषी आढळणाऱ्या कंपनी किंवा विक्रेत्यांवर बियाणे अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.