
कुकडीच्या हक्काच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; 'डिंबे-माणिकडोह' बोगद्यासाठी 23 नोव्हेंबरपासून तीव्र आंदोलनाचा इशारा
अहमदनगर / पोपट पिटेकर : कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे ६.२१ टीएमसी पाणी मिळावे आणि डिंबे-माणिकडोह बोगदा कालवा पातळीलाच व्हावा, या प्रमुख मागणीसाठी कुकडी लाभक्षेत्रातील शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘डिंबे-माणिकडोह बोगदा निर्माण कृती समिती’च्या वतीने २३ नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ डिसेंबर रोजी बेलवंडी फाटा येथे चार तालुक्यांतील शेतकरी एकत्र येऊन भव्य रास्ता रोको करणार असल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष घनश्याम शेलार यांनी दिली.
कुकडी प्रकल्पाचा जुन्नरपासून करमाळ्यापर्यंतचा सुमारे २४९ किलोमीटरचा डावा कालवा आहे. या कालव्यावर पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आणि करमाळा या चार तालुक्यांतील शेती व हजारो कोटी रुपयांच्या फळबागा अवलंबून आहेत. मात्र, प्रकल्प अहवालानुसार डिंबे ते येडगाव धरणादरम्यानचा ५५ किलोमीटरचा कालवा रोजगार हमी योजनेतून तयार करण्यात आला होता. या कालव्याला मोठ्या प्रमाणावर गळती असल्याने कुकडी डाव्या कालव्याच्या वाट्याचे डिंबे धरणातील ६.२१ टीएमसी पाणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना कधीच पूर्णपणे मिळाले नाही.
या पाणी टंचाईवर डिंबे-माणिकडोह बोगदा हाच एकमेव कायमस्वरूपी उपाय आहे. मात्र, हा बोगदा समुद्रसपाटीपासून ६७९ मीटर उंचीवर झाल्यासच ६.२१ टीएमसी पाणी पूर्ण क्षमतेने कुकडी कालव्यात येऊ शकते. तांत्रिकदृष्ट्या या पातळीवर बोगदा न झाल्यास कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे भविष्य अंधकारमय होईल, अशी भीती समितीने व्यक्त केली आहे.
वीज प्रकल्प आणि वृक्षतोडीवरून संताप
एकीकडे शेतकरी हक्काच्या पाण्यासाठी झगडत असताना, दुसरीकडे सरकार माणिकडोह धरणातील जास्तीचे पाणी वापरून एक नवीन वीज प्रकल्प उभारण्याच्या तयारीत असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकल्पासाठी आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असून, तिथे स्थानिकांचे आंदोलन सुरू आहे. कागदोपत्री वृक्षतोडीचा आकडा किरकोळ दाखवला जात असला, तरी प्रत्यक्षात निसर्गाची मोठी हानी होणार आहे. जर डिंबे-माणिकडोह बोगद्यातून केवळ ओव्हरफ्लोचे पाणी देण्याचे नियोजन असेल आणि तेही पाणी या नवीन वीज प्रकल्पाकडे वळवले गेले, तर कुकडी खालचा शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, असा गंभीर इशारा घनश्याम शेलार यांनी दिला आहे.
डिंबे-माणिकडोह बोगद्याचे काम मार्गी लावावे
कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे संपूर्ण जीवन या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून ६७९ मीटर पातळीवरच डिंबे-माणिकडोह बोगद्याचे काम मार्गी लावावे, अन्यथा हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असे कृती समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
असे असेल आंदोलनाचे वेळापत्रक…
कृती समितीच्या झालेल्या बैठकीत चारही तालुक्यांत आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली आहे.
– २३ नोव्हेंबर-कर्जत तहसील कार्यालयावर धडक आंदोलन
– २७ नोव्हेंबर-करमाळा तहसील कार्यालयावर मोर्चा व निदर्शने
– ३० नोव्हेंबर-श्रीगोंदा तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलन
– १ डिसेंबर-बेलवंडी फाटा येथे पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आणि करमाळा तालुक्यांतील सर्व शेतकऱ्यांचा एकत्रित भव्य ‘रास्ता रोको’
FAQ
1. कुकडी प्रकल्पातील शेतकऱ्यांची प्रमुख मागणी काय आहे?
शेतकऱ्यांना हक्काचे ६.२१ टीएमसी पाणी मिळावे आणि डिंबे-माणिकडोह बोगदा कालवा पातळीलाच व्हावा, अशी मागणी आहे.
2. शेतकरी आंदोलन कधीपासून सुरू करणार आहेत?
२३ नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.
3. १ डिसेंबर रोजी कोणते आंदोलन होणार आहे?
बेलवंडी फाटा येथे चार तालुक्यांतील शेतकरी एकत्र येऊन भव्य रास्ता रोको करणार आहेत.