भीषण अपघातात ८ भाविकांचा मृत्यू
नंदुरबार : अश्वत्थामा (अस्तंबा) ऋषीचा यात्रेतून परतणाऱ्या भाविकांच्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. चांदसैली (ता. तळोदा) घाटात पलटी होऊन झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन ते चार जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघातात जखमी झालेल्या भाविकांवर तळोदा उपजिल्हा रुग्णालयात व नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
अस्तंबा ऋषीचा यात्रेला सुरुवात झाली असून, शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास यात्रा करून घरी परतताना भाविकांच्या वाहन (एमएच ३९ एडी २८०२) चांदसैली घाटात भीषण अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी अनेक भाविक यात्रा करून परतत होते. लागलीच त्यांनी मदतकार्य सुरू केले. अपघातात जखमी झालेल्यांना भाविकांना तातडीने उपचारासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात इतका भीषण होता की, अनेकजण जागीच मृत्युमुखी पडले तर जखमी भाविक दुखापतींनी विव्हळताना दिसून आले.
दरम्यान, या अपघातात पवन मिस्तरी (२४ वर्ष), बापू धनगर (२४ वर्ष), चेतन पाटील (२३ वर्ष) भूषण गोसावी (३० वर्ष) राहुल मिस्तरी (२२ वर्ष), कोरीट येथील हियालयल फडके, योगेश ठाकरे आणि नंदुरबार शहरातील गणेश संजय भील (१५ वर्ष) अशा एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
आमदार पाडवींकडून मदत
आमदार राजेश पाडवी यांच्या माध्यमातून देखील तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. आमदारांच्या सूचनेनुसार योगेश मराठे, वाहन चालक अण्णा पाटील, रोहन गुरव, पमू गुरव, मुकेश बिरारे यांनी जखमींना रुग्णालयात पोहचवले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयात डॉ. गोविंद शेळके, डॉ. अशोक वळवी, डॉ. गणेश पवार, डॉ. परेश चावडा, डॉ. सय्यद पठाण, डॉ. योगेश्वर चौधरी, डॉ. लक्ष्मीकांत चौधरी व उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी जखमींवर उपचार केले.