Pimpri Fire News: पिंपरीत गादी कारखान्यात आग; दोन जखमी तर सात तरुणींना..., नेमके काय घडले?
पिंपरी; पिंपरी मधील झिरो बॉईज चौकात गादी कारखाना आणि फर्निचर दुकानाला बुधवारी (२ एप्रिल) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आग लागली. दुकानाच्या इमारतीमध्ये भाड्याने राहणाऱ्या सात तरुणींना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षित ठिकाणी हलवले. तर या आगीमध्ये दोन तरुणी जखमी झाल्या आहेत. चेतना वासुदेव सावरकर (वय २६), अश्विनी प्रमोदराव वाखडे (वय २४, रा. पिंपरी) अशी जखमींची नावे आहेत.
झिरो बॉईज चौकात नितीन जाधव यांची इमारत आहे. या इमारतीच्या वरील बाजूला वन बीएचके दोन आणि वन आरके दोन सदनिका आहेत. इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरवर परमेश्वर इंटरप्रायजेस नावाचा गादी कारखाना आणि सजावट फर्निचर ही दोन दुकाने आहेत. इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट झाल्याने दोन्ही दुकानांना बुधवारी सायंकाळी आग लागली. कापसाला आग लागल्याने आग अचानक भडकली.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रातील चार, भोसरी, मोशी, चिखली, प्राधिकरण, थेरगाव येथील प्रत्येकी एक असे एकूण नऊ बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाणी मारून आग विझवली. या घटनेत चेतना आणि अश्विनी या दोन तरुणी किरकोळ जखमी झाल्या. दरम्यान, इमारतीमधील एका सदनिकेत सात तरुणी अडकल्या होत्या. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूपपणे बाहेर काढले. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
धनकवडीमध्ये चहाच्या हॉटेलमध्ये आग
हॉटेलमध्ये दूध तापविताना सिलेंडरमधून गॅसची गळती होउन लागलेल्या आगीत 24 वर्षीय कामगार ठार झाला आहे. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशीच धनकवडीत आगीच्या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. आगीची घटना रविवारी संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास धनकवडी के के मार्केटनजीक साईबा हॉटेलमध्ये घडली आहे. संतोष (वय 24) असे ठार झालेल्या कामगाराचे नाव आहे.
धनकवडी परिसरातील के के मार्केटनजीक साईबा हॉटेल असून, त्याठिकाणी 30 मार्चला संध्याकाळी सव्वा चारला आग लागल्याची माहिती अग्निशमक दलाला मिळाली. काञज व गंगाधाम अग्निशमन केंद्राचे वाहन रवाना करण्यात आले. घटनास्थळी जवानांनी धाव घेत हॉटेलमध्ये अडकलेल्या कामगाराला बाहेर काढण्यास प्राधान्य दिले. पाण्याचा मारा करत कामगारास जवानांनी जखमी अवस्थेत बाहेर काढून तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. तेथील आग पुर्ण विझवत धोका दुर केला.पुण्यातील धनकवडीमध्ये चहाच्या हॉटेलमध्ये आग, कामगाराचा मृत्यू
शेजारी असलेल्या दोन दुकानांना आगीची झळ बसून काही नुकसान झाले. वेळीच आग आटोक्यात आणल्याने इतरत्र पसरली नाही. आगीमध्ये हॉटेलमधील सर्व साहित्य जळाले असून, दुध तापवित असताना वायूगळती झाल्यामुळे सिलेंडरमुळे आग लागली. त्याचवेळी संतोषला हॉटेलबाहेर पडता आले नाही. त्यामुळे गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हॉटेलमध्ये एकूण आठपैकी तीन सिलेंडरमधून त्यापैंकी मोठ्या प्रमाणात वायुगळती झाली. आगीमध्ये कामगाराचा मृत्यू झाला आहे. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी स्टेशन ऑफीसर सुनील नाईकनवरे, रामदास शिंदे, भरत वाडकर, बांदीवडेकर यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचार्यांनी प्राधान्य दिले.