dcm Devendra Fadnavis reaction on Baba Siddiqui's murder
नागपूर : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली. तीन ते चार गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. यामध्ये त्यांच्या छातीवर गोळ्या झाडल्यामुळे त्यांच्या उपचारामध्ये मृत्यू झाला. या घटनेची आता कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गॅंगने जबाबदारी घेतली आहे. यावर राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ही दुर्दैवी आणि अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे. बाबा सिद्दिकी यांच्याशी माझी स्वतःची निकटची मैत्री होती. अनेक वर्ष आम्ही सोबत काम केलं. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनेने आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. आता या घटनेतील दोन आरोपी पकडलेले आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील काही धागेदोरे मिळत आहेत. काही अँगल्स लक्षात येत आहेत. मात्र, त्या संदर्भात आता लगेच बोलणं योग्य नाही. आज आरोपींची कस्टडी झाल्यानंतर पोलीस या संदर्भात माहिती देतील,” अशी प्रतिक्रिया गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
या प्रकरणावरुन कायदा व सुव्यवस्था राज्यामध्ये नसल्याची टीका विरोधकांनी केली. तसेच शरद पवार यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. चौकशी नको आता थेट सरकारमधून बाहेर पडा, अशी टीका शरद पवार यांनी केली होती. यावर उत्तर देत गृहमंत्री फडणवीस म्हणाले की, “त्यांना केवळ सत्ताच पाहिजे आहे. इतकी गंभीर घटना झाल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे. आमच्या नजरेसमोर फक्त महाराष्ट्र आहे. आम्हाला महाराष्ट्राकडे पाहायचे आहे. महाराष्ट्राचा विकास आणि सुरक्षा पाहायची आहे. त्यामुळे ते खुर्चीकडे पाहत आहेत. त्यांनी खुर्चीकडे बघावे, त्यांना जे बोलायचे आहे ते त्यांनी बोलावे,” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
राहुल गांधींनी दिली प्रतिक्रिया
कॉंग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील महायुतीच्या सरकारवर या हत्या प्रकरणावरुन निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, “बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूचं वृत्त धक्कादायक आणि क्लेशदायक आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबसह आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या घटनेने महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे हेच दिसून येतं आहे. सरकारने याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि बाबा सिद्दीकींना न्याय मिळाला पाहिजे,” असे मत राहुल गांधींनी व्यक्त केले.