
गुहागरातील मच्छिमार मासळीविना आर्थिक संकटात; वातावरणातील बदलाचा फटका
गुहागर : जिल्ह्याच्या किनारपट्टीवर सध्या वातावरणातील विचित्र बदलांचा मोठा परिणाम मासेमारी व्यवसायावर दिसून येत आहे. पहाटेच्या सुमारास गारवा आणि दुपारी झपाट्याने वाढणारे तापमान, अशा दुहेरी हवामानामुळे मासळीच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. समुद्राच्या पाण्याचे तापमान आणि प्रवाहांच्या दिशेत सातत्याने बदल होत असल्याने मासळीचे थवे स्थलांतरित होत आहेत.
मासळीच्या शोधार्थ खोल समुद्रात जाऊनही जाळ्यात हवी तशी आवक मिळत नाही. त्यामुळे गुहागर परिसरातील अनेक मच्छिमारांना भर समुद्रातून रिकाम्या हाती परतावे लागत आहे. त्यामुळे इंधनाचा खर्च आणि मजुरी परवडेनाशी झाल्याने अनेक नौकामालकांनी मासेमारीला जाणे तूर्तास टाळले आहे. हवामानातील बदलांचा फटका थेट तंत्रज्ञानालाही बसत आहे. मासे शोधण्यासाठी वापरले जाणारे ‘फिश फाइंडर किंवा इको साउंडर’सारखी सोनार तंत्रज्ञानावर आधारित उपकरणेही अपेक्षेप्रमाणे काम करत नसल्याचे मच्छिमार सांगतात.
तापमानात होणाऱ्या अचानक बदलामुळे मासे आपली ठिकाणे बदलत असल्याने रडारवर अचूक नोंद मिळत नाही. याचा परिणाम मासेमारीवर होत आहे. ताज्या मासळीचे दर सध्या दुप्पट, तिप्पट वाढले असून, सुरमई, पापलेट, कोळंबीसारखी लोकप्रिय मासळी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. काही दिवसांपूर्वी पापलेट ६०० रुपये किलोने मिळत होती; मात्र आता ती बाराशे रुपये किलो झाली आहे. तर काही ठिकाणी मोठ्या आकाराची पापलेट दोन हजार रुपये किलोदराने विकली जात आहे. ताज्या मासळीला मोठी मागणी असल्याने बंदरात आलेली मासळी लिलावात हातोहात विकली जात आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत मासळी शिल्लक राहत नाही, असे स्थानिक विक्रेते सांगत आहेत.
मच्छिमार, ग्राहकांचा महागाईशी सामना
सध्याच्या हंगामात जवळा, कोळंबी, माकूल अशी मासळी मिळते. या मासळीला लिलावात जास्त मागणी नसल्याने ती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होते तर पापलेट, सुरमईसारखे प्रकार स्थानिक बाजारात विक्रीसाठी शिल्लकच राहात नाहीत. एकूणच हवामानातील अस्थिरतेमुळे मच्छिमार आणि ग्राहक दोघांनाही सध्या महागाईचा सामना करावा लागत आहे. मासळी मिळत नसल्याची अनेक कारणे आहेत. त्याला बेकायदेशीर आणि बंदी कालावधीत होणारी मासेमारीही तितकीच कारणीभूत आहे. मत्स्य व्यवसाय विभागाने यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
हेदेखील वाचा : Ratnagiri News: मत्स्य व्यवसायाला हवामान बदलाचा फटका; भाव २५-३० टक्क्यांनी वाढले