भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज (१५ डिसेंबर) विधीमंडळ अधिवेशनादरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नाशिकमधील पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांचे १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगाराबरोबरचे डान्स करतानाचा व्हिडीओ दाखविला. तसेच सुधाकर बडगुजर आणि ठाकरे गटावर गंभीर आरोप करत कारवाईची मागणीदेखील केली. राणे यांची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनीही लावून धरली.
दरम्यान, सुधाकर बडगुजर यांच्या बचावासाठी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे पुढे आल्या आहेत. अंधारे यांनीदेखील प्रसारमाध्यमांना काही फोटो आणि व्हिडीओ दाखवले. यामध्ये भाजपाचे अनेक नेते दिसत आहेत. सुषमा अंधारे म्हणाल्या, “हे फोटो आणि व्हिडीओ त्याच पार्टीतले आहेत, ज्याचे फोटो नितेश राणे यांनी दाखवले होते.” यासह अंधारे यांनी नितेश राणे आणि भाजपा नेत्यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं.कथित व्हिडिओमध्ये भाजपाचे अनेक नेते दिसत आहेत. सुषमा अंधारे म्हणाल्या, “हे फोटो आणि व्हिडीओ त्याच पार्टीतले आहेत, ज्याचे फोटो नितेश राणे यांनी दाखवले होते. त्या पार्टीत मंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, विकांत चांदवडकर असे सगळे लोक दिसत आहेत. ती कोणाच्या तरी हळदीची की लग्नाची पार्टी होती. त्यामधील आमच्या पदाधिकाऱ्याचा फोटो दाखवून नितेश राणे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, नितेश राणे यांना माहिती नसावं की हा फोटो दाखवल्यामुळे ते किती जोरात तोंडघशी पडतील. त्या पार्टीत हे सगळे भाजपा नेते काय करत आहेत? त्याचंही उत्तर राणे आणि भाजपा नेत्यांनी द्यावं, असेही त्या म्हणाल्या.
नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनात आज (१५ डिसेंबर) नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचे काही फोटो दाखवले. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी सलीम कुर्लाबरोबरचे कथित फोटो दाखवून राणे यांनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले. तसेच बडगुजर यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल, असं जाहीर केलं.