विजेच्या तीव्र धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू; क्षणात झालं होत्याचं नव्हतं...
जळगाव : गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यातच या पावसात अनेक दुर्घटनाही घडत आहेत. असे असताना जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात वरखेडी येथे शेतात झोपलेल्या मजूर कुटुंबावर काळाने घाला घातला. विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला.
वरखेडी येथील दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आई, मुलगा, सून आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. तर, एक चिमुकली बचावली. मिळालेल्या माहितीनुसार, मजुरीचे काम करणारे पावरा कुटुंब एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथील एका शेतात मुक्कामाला थांबले होते. या शेताला घालण्यात आलेल्या कुंपणात विजेचा प्रवाह उतरला आणि विजेचा धक्का बसून पावरा कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखले झाले. हे कुटुंब कुठले आहे याची ओळख पटविली जात आहे. माहिती मिळताच तहसीलदार प्रदीप पाटील यांच्यासह वीज वितरण कंपनीचे अधीकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनात याप्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.
हेदेखील वाचा : मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक
स्लॅबचे काम करताना अपघात
दुसऱ्या एका घटनेत, एका घराचा स्लॅब टाकण्यात आल्यावर सिमेंट काँक्रेटचे मिक्सर बाहेर काढताना अपघात झाला. यामध्ये 14 मजुरांना विजेचा जोरदार धक्का बसल्याची घटना जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात घडली. या दुर्दैवी घटनेमध्ये एका अल्पवयीन मजुराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेदेखील वाचा : Konkan Ganesh Festival: चाकरमान्यांसाठी दिलासदायक! गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी