प्रभाग रचनेच्या आराखड्यावरील सुनावणींची औपचारिकता पूर्ण; आता बदलाकडे लागले सर्वांचे लक्ष
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रभाग रचनेच्या प्रारुप आराखड्यावरील सुनावणींची औपचारिकता शुक्रवारी पूर्ण झाली. आता घेण्यात आलेल्या हरकतीनुसार प्रभाग रचनेत किती बदल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय संघर्ष पुढील काळात वाढत जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रभाग रचनेच्या प्रारुप आराखड्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या. सुमारे ५ हजार ९२२ हरकती दाखल झाल्या. त्यावर गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर सचिव व्ही. राधा यांनी सुनावणी घेतली. यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओम प्रकाश दिवटे, एम. जे. प्रदीप चंद्रन, निवडणुक निर्णय अधिकारी प्रसाद काटकर आदी उपस्थित होते.
प्रभागनिहाय आलेल्या हरकतींवर सलग दोन सुनावणी झाली. यात ८२८ हरकतदारांनी प्रत्यक्ष सुनावणीत सहभाग घेतला. यामध्ये प्रामुख्याने प्रभागाच्या सीमा ठरविताना राज्य निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन केले गेले नाही. भौगोलिक रचनेचा विचार केला गेला नाही अशा स्वरुपाच्या हरकतींचे यात प्रमाण अधिक होते.
तसेच काही प्रभागांची रचना करताना एससी आरक्षण कायम राहणार नाही, यासाठी मतदारयाद्या फोडून त्या दुसऱ्या प्रभागाला जोडल्या गेल्या, असा आरोपही काही हरकतदारांनी करत जोरदार विरोध नोंदविला होता. प्रभाग रचना तयार करताना लोकसंख्या, प्रगणक गट आणि नैसर्गिक सीमांचा समतोल साधणे अवघड होत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
औपचारिकता पूर्ण; आता लक्ष अंतिम रचनेकडे
मागील निवडणुकीच्यावेळी हरकतींवर झालेल्या सुनावणीनंतर साधारणपणे सहा टक्के बदल करत अंतिम रचना जाहीर केली गेली होती. यावर्षी हरकतींवरील सुनावणीची औपचारिकता आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे अंतिम रचना कशी असेल याविषयी उत्सुकता निर्माण झाली. सुनावणीची प्रक्रिया ही लोकशाहीतील महत्वाचा टप्पा असून, यानंतर हरकतींचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर अंतिम रचना जाहीर केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगितले आले.
३४, ३८, १३,१५, २४ या प्रभागात अधिक हरकती
नवीन प्रभाग रचनेनुसार जाहीर झालेल्या प्रभाग क्रमांक ३४, ३, ३८, १३, १५, २४ या प्रभागांच्या प्रारुप रचनेवर अधिक हरकती आल्या हाेत्या. प्रभाग क्रमांक ३४ मध्ये २ हजार १३७ हरकती आल्या हाेत्या. यासाठी ७७ हरकतदारांनी हजेरी लावली हाेती. प्रभाग क्रमांक ३ साठी ८१९ हरकतींसाठी ५१ जण, प्रभाग क्रमांक १५ साठी ५६४ हरकतींसाठी ३०, प्रभाग क्रमांक २४ साठी ३७१ हरकतींसाठी ८५ जण, प्रभाग क्रमांक ३८ साठी दाखल २०० हरकतींवरील सुनावणीसाठी ७६ जण उपस्थित झाले हाेते. या दाेन दिवसांत ५९२२ हरकतींवरील सुनावणीसाठी ८२८ जण सहभागी झाले हाेते.