
श्रेयवाद नको, शेतकर्यांसाठी एकत्र लढू; संजय पाटील यांची रोहित पाटलांना साद
सांगली : सिद्धेवाडी मध्यम प्रकल्पाच्या डावा-उजवा कालव्याच्या कामाबाबत मी खासदार असताना २०२३ मध्येच पाठपुरावा करुन गती घेतली आहे. आमदारांनी जुन्या कामाचे श्रेय घेऊन पाण्याचे राजकारण करण्याची गरज नाही. शेतकरी कोलमडून पडला आहे. राजकीय संघर्ष थांबवून शेतकरी उभा करण्याची गरज आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या प्रश्नांवर एकत्र येऊन लढू, अशी साद माजी खासदार संजय पाटील यांनी आमदार रोहित पाटील यांना शनिवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत घातली.
माजी खासदार पाटील म्हणाले, सिद्धेवाडी मध्यम प्रकल्पााच डावा-उजवा कालव्याच्या कामाबाबत मी खासदार असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 2023 मध्ये पाठपुरावा केला होता. त्यानंतर कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी वस्तुस्थितीबाबतचा अहवाल प्रस्तावासह दाखल केला होता. जलसंपदा विभागाकडून सिद्धेवाडी प्रकल्पाच्या डावा व उजवा कालवा विशेष दुरुस्ती कामासाठी 24.62 कोटी रुपयांच्या कामांसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कालव्याच्या कामांबाबत मी यापूर्वीच पाठपुरावा करुन मंजूर केला आहे. त्यामुळे आमदार सिद्धेवाडी कालव्याच्या कामांचे श्रेय घेत आहेत. दुसर्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे योग्य नाही.
सद्यस्थितीत तालुक्यातील शेतकरी कोलमडून पडला आहे. द्राक्ष, डाळिंबाच्या बागा तोडून टाकत आहेत. श्रेयवाद आणि इर्षेचा वाद घालून कुणाची तरी जिरवायच्या नादात राजकारण करु नये. तुम्ही खरंच काय आणलं, आपण खोटं काय-काय सांगता, हे सांगण्याची ही वेळ नाही. लोकांकडून ही संघर्ष करण्याची वेळ नाही. मतभेद थांबवून प्रश्न सोडवू, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. या कारणांनी सद्यस्थितीत शेतकर्यांना उभे करण्याची गरज आहे. त्यामुळे आमदारांनी शेतकर्यांच्या प्रश्नांवर एकत्र यावे, अशी साद माजी खासदार पाटील यांनी आमदार रोहित पाटील यांना घातली. सत्ता नसली तरी शेतकर्यांना सोबत घेवून लढा उभारण्याची गरज असल्याचे माजी खासदार पाटील यांनी सांगितले.
विमानतळासाठी लोकांना फसवू नका
कवलापूर येथे विमानतळ उभारण्यासाठी 300 ते 350 एकर जागा आवश्यक आहे. ऐवढी जागा असल्याशिवाय धावट्टी होत नाही. सध्या आपल्याकडे दीडशे ते एकशे साठ एकर जागा उपलब्ध आहे. उर्वरित जागा उपलब्ध करणे शक्य आहे का? असा सवाल करीत विमानतळासाठी लोकांना फसवण्याची भूमिका घेऊ नका, असे आवाहनही माजी खासदार पाटील यांनी केले. आम्ही अॅग्रो पोर्टची मागणी केली होती, त्यासाठी सध्याच्या जागेमध्ये आणखी चाळीस एकर जागा उपलब्ध झाल्यास अॅग्री पोर्ट उभारणे शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
आघाडीसाठी विश्वजीत कदम यांच्याशी लवकरच बैठक
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आघाडी करण्याबाबत यापूर्वी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांच्याशी यापूर्वी एकवेळ चर्चा झाली आहे. काँग्रेसचे नेते आमदार विश्वजीत कदम यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकत्र बसू, असा निरोप दिला आहे, पुढील काही दिवसात आम्ही एकत्र बसू, असे संजय पाटील यांनी सांगितले.