वडगाव मावळ : ग्रामीण भागातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने घर ते परीक्षा केंद्र अशी मोफत सेवा सुरु करण्यात आली आहे.या उपक्रमाचे सलग सातवे वर्ष असून दरवर्षी या उपक्रमाचा अडीच हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परीक्षा बुधवारपासून (दि.२१) सुरु झाली आहे.मावळ तालुक्यातील पाच परीक्षा केंद्रावर ४७३८ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी असलेल्या परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचणे आवश्यक असते.परंतु इतर वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून राहणे प्रत्येक विद्यार्थ्याला शक्य नसते.ही गरज ओळखून मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकारातून सन २०१६-१७ पासून तालुक्यातील विविध भागातून घर ते परीक्षा केंद्र अशी मोफत वाहतुक सेवा सुरु करण्यात आली आहे.
तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी कॉलेज केंद्रावर २०९५ विद्यार्थी, व्हीपीएस हायस्कूल लोणावळा १४५० विद्यार्थी, पवना ज्यु.कॉलेज पवनानगर ३७० विद्यार्थी, पंडित नेहरु माध्य.विद्यालय कामशेत ४८५ विद्यार्थी, श्री शिवाजी विद्यालय देहूरोड ३३८ विद्यार्थी यंदा बारावीची परिक्षा देत आहेत.आंदर मावळ,पवन मावळ,नाणे मावळ भागातील पवनानगर,कान्हे, कार्ला, शिवणे, उर्से,थोरण,चिखलसे, निगडे,आंबळे, इंदोरी,पाथरगाव, खांडी आदी गावांमधून विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर जाण्या-येण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
विद्यार्थी इतर वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून राहिल्यास परिक्षेला उशीर होऊन शैक्षणिक नुकसान होण्याची संभावना असते.घरापासुन परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचले पाहिजे.तसेच परिक्षेच्या काळात अभ्यासासाठी अधिक वेळ देखील मिळाला पाहिजे.यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी योग्य नियोजन केल्याबद्दल पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.