''माझ्यावर वरिष्ठांचं दडपण तुम्ही पवारसाहेबांना...'' अनिल देशमुखांबाबत गिरीश महाजनांचा मोठा गौप्यस्फोट
महाविकास आघाडीचे सरकार असताना गृहमंत्री असणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गिरीश महाजन यांच्याखोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दवाब टाकल्याचा आरोप करत सीबीआयने देशमुखांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यावर आता मंत्री गिरीश महाजन यांनी देखील भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी अनिल देशमुख यांच्याबाबत अनेक गौप्य्स्फोट केले आहेत.
माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले, ”माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या नेत्यांनी माझ्या विरोधात कटकारस्थान केले आहे हे आता समोर आले आहे. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे हे गुन्हा दाखल करण्यास तयार नव्हते. ते महिनाभर थांबले. घटना पुण्यात घडली आणि गुन्हा जळगावमध्ये नोंदवायला सांगितला. हे कस काय शक्य आहे? यासाठी जळगावचे एसपी तयार नव्हते.”
पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, ”अनिल देशमुख यांनी एसपी प्रवीण मुंढे यांच्यावर दबाव आणला. खालच्या भाषेत ते एसपींशी बोलले. त्यानंतर एसपी माझ्याशी बोलले, गिरीश भाऊ माझ्यावर दडपण आणले जाते. मला सस्पेंड करण्याची धमकी दिली जात आहे. त्यानंतर मी स्वतः यासंदर्भात अनिल देशमुख यांना भेटलो. त्यानंतर देशमुख म्हणाले मी हतबल आहे. माझ्यावर वरिष्ठांचं दडपण आहे. तुम्ही पवारसाहेबांना भेटून घ्या. तरच मी तुमची काही मदत करू शकेन. वाटले तर त्यांना माझ्यासमोर विचारा की गिरीश महाजन तुम्हाला कितीवेळा भेटले?”
अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल
सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने महाविकास आघाडीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून विद्यमान मंत्री व आमदार गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा आरोपांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विद्यमान गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा: CBI कडून देशमुखांविरुद्ध ‘या’ प्रकरणात गुन्हा दाखल; माजी गृहमंत्री म्हणाले, फडणवीसांकडून…
गिरीश महाजन यांच्या या प्रकरणात सीबीआयने अनिल देशमुख यांना आरोपी केले आहे. याआधी या प्रकरणात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण इतर काही जणांना आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणात जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध जवाब दिला होता. त्यानंतर सीबीआयने देशमुखांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर देशमुखांची देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले आहेत. किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले जात आहे असे देशमुख म्हणाले आहेत.