
मुंबई : वयोवृध्दांबरोबरच तरुणांमधील ब्रेन स्ट्रोकचे ( मेंदू झटका) प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जागतिक स्ट्रोक दिनानिमित्त परेल येथील ग्लोबल हॉस्पिटलच्या वतीने विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्या व्यक्तींनी स्ट्रोकवर मात केली आहे अशा व्यक्तींच्या प्रेरणादायी प्रवासावर प्रकाश टाकत इतर रुग्णांना यामाध्यमातून प्रेरणा देण्यात आली. प्रसिध्द बॉलीवूड अभिनेता संजय दत्त यांनी देखील या कार्यक्रमात सहभागी होत उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमातंर्गत स्ट्रोक वर मात करणाऱ्या १० व्यक्तींच्या यशस्वी प्रवासाविषयी माहिती आणि त्यांचा गौरव करण्यात आला. डॉ. नितीन डांगे (वरिष्ठ सल्लागार,न्यूरो सर्जरी आणि एंडोव्हस्कुलर सर्जरी) तसेच इतर तज्ञांनी या उपक्रमाला हजेरी लावली. मेंदूच्या रक्तपुरठ्यात अडथळा निर्माण झाल्यास रक्तवाहिन्यात रक्ताची गुठळी तयार होते. यामुळे रक्तवाहिनी फुटल्याने अथवा रक्तपुरवठा न झाल्याने ब्रेन स्ट्रोक होतो. अशी माहिती यावेळी डांगेनी माहिती दिली
डॉ. डांगे पुढे म्हणाले की, ग्लोबल हॉस्पिटल्समध्ये, आम्ही विविध उपक्रमाच्या माध्यमातून स्ट्रोकविषयी जनजागृती करतो आणि त्यावर मात केलेल्या व्यक्तींना भविष्यातील वाटचालीकरिता प्रोत्साहन देत त्यांना आधार देतो.
या उपक्रमाचे स्वागत करताना प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त यांनी स्ट्रोकसंबंधीत करत असलेल्या जनजागृतीकरिता हॉस्पिटलच्या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, हॉस्पिटलच्या या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाने रुग्णांना बरे होण्याकरिता सकारात्मक दृष्टीकोन आणि प्रेरणा मिळते. या उपक्रमाला पाठिंबा देणे तसेच स्ट्रोकवर मात करुन पुन्हा नव्याने आयुष्य सुरु केलेल्या व्यक्तींचा सन्मान करणे हा खरोखरच स्तुत्य उपक्रम आहे. स्ट्रोकवर यशस्वी मात केलेल्या सुरेश मेनन यांच्या प्रेरणादायी शब्दांनी या कार्यक्रमाची सांगता झाली. ही नवी ओळख माझ्या पुढच्या वाटचालीला बळ देणारी आहे. मला मिळालेले नव्या आयुष्यासाठी मी रुग्णालयाचे आभार मानतो असे वक्तव्य मेनन यांनी या प्रसंगी केले.