नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु; एलिव्हेटेड रोडसाठी केंद्राकडे प्रस्ताव (सौजन्य - नवराष्ट्र टीम)
पुणे : पुणे येथील नवले पुलावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सुमारे 6 हजार कोटी रुपयांचा एलिव्हेटेड रोड प्रकल्प केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत सांगितले.
खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी नवले पुलावर सातत्याने घडणाऱ्या अपघातांबाबत तसेच ते रोखण्याबाबत सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत, याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. संबंधित राष्ट्रीय महामार्गाचा सुमारे पाच ते सहा किलोमीटरचा भाग तांत्रिकदृष्ट्या संवेदनशील आहे. रस्त्याचा उतार अत्यंत तीव्र नसला तरी ग्रामीण भागातून शहराकडे येणाऱ्या जड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण आहे. पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून एलिव्हेटेड रोड उभारणे आवश्यक आहे, असे कदम म्हणाले.
अपघातांत चार वर्षांत झाला ११ जणांचा मृत्यू
मागील चार वर्षांची अपघातांची आकडेवारी देताना मंत्री कदम यांनी सांगितले की, २०२२ मध्ये १२ अपघात झाले होते, २०२३ मध्ये तीन, २०२४ मध्ये पाच, तर २०२५ मध्ये अपघातांची संख्या वाढून १६ झाली आहे. मृतांची संख्या २०२२ मध्ये चार, २०२३ मध्ये दोन, २०२४ मध्ये तीन असून, २०२५ मध्ये एका अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या ११ वर पोहोचली होती. जखमींना आवश्यक ती आर्थिक मदत आणि उपचारही देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अवजड वाहनांना वाहतुकीसाठी वेळेची मर्यादा
संबंधित ठिकाण ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. अपघात होवू नयेत म्हणून रस्त्याची रुंदी ७ मीटरवरून १०.५ मीटरपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच वेगमर्यादा ६० किमी प्रतितासवरून ४० किमी करण्यात आली आहे. वाहतूक पोलीस बंदोबस्त वाढविणे, स्वयंसेवकांची नियुक्ती, तसेच जड वाहनांसाठी सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत वेळेची मर्यादा घालण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एलिव्हेटेड रोड प्रकल्पाला लवकर मंजुरी
संयुक्त बैठका घेऊन विविध उपाययोजना राबवण्यात येत असून, कायमस्वरूपी तोडगा म्हणून एलिव्हेटेड रोड प्रकल्पाला लवकर मंजुरी मिळविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहेच असेही त्यांनी सांगितले. या चर्चेत सदस्य शंकर जगताप यांनी सहभाग घेतला.
हेदेखील वाचा : नवले पुलावरील अपघातांचा मुद्दा लोकसभेत; सुप्रिया सुळेंच्या प्रश्नावर गडकरींनी दिलं आश्वासन






