
सांगली 'सिव्हिल'मधील ५०० बेडच्या रुग्णालयासाठी अधिवेशनानंतर बैठक; हसन मुश्रीफ यांची पृथ्वीराज पाटील यांना ग्वाही
महाविकास आघाडीचे सरकार असताना पृथ्वीराज पाटील यांनी तात्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडून २०२२ मध्ये ५०० बेडचे रुग्णालय मंजूर करून घेतले होते. कोरोनाच्या काळात सिव्हिल रुग्णालयात रुग्णांची हेळसांड झाली होती. बेड कमी पडत होते. त्यानंतरही सामान्य रुग्णांना उत्तम सुविधा देण्यासाठी अतिरिक्त बेडच्या रुग्णालयाची गरज समोर आली होती. त्यामुळे श्री. पाटील यांनी आग्रही भूमिका घेत त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यावेळी सदरच्या हॉस्पीटल इमारतींच्या बांधकाम अंदाज पत्रकास मान्यता मिळाली होती. २३३ कोटी इतक्या रक्कमेच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.
Sangli DPC Members List: सांगली जिल्हा नियोजन समितीवर १५ सदस्यांची नियुक्ती; काय आहे नवीन GR?
दोन वर्षापुर्वी या बांधकामाचे अंदाजपत्रक वाढल्यामुळे नव्याने प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय अधिष्ठातांनी दाखल केला आहे. या प्रस्तावास अद्यापही प्रशासकीय मंजुरी मिळाली नाही. त्याबाबत श्री. पाटील यांनी मंत्री श्री. मुश्रीफ यांना अवगत केले. त्यांनी त्याची दखल घेत पावसाळी अधिवेशनानंतर तातडीने बैठक घेऊ, अशी ग्वाही दिली.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘‘सांगली शहरासह जिल्ह्यातील, कर्नाटक सीमा भागातील, कोकण पट्ट्यातील असंख्य रुग्ण सांगलीत उपचारासाठी येत असतात. त्यांच्या सोयीसाठी अतिरिक्त ५०० बेडगे रुग्णालय खूप गरजेचे आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी याआधी रुग्णालयाची पाहणी केलेली आहे. आता नव्याने प्रशासकीय मान्यता गरजेची असून त्यासाठी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हा प्रश्न लवकर मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न आहे.