कासेगाव परिसरात पुन्हा मुसळधार पावसाचे थैमान; शेतकऱ्यांवर आस्मानी संकट, शेताला तळ्याचे स्वरुप
पंढरपूर / नवनाथ खिलारे : पंढरपूर तालुक्यातील पूर्व भागाच्या कासेगाव परिसरात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी पुन्हा पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे या परिसरातील ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. या भागातील तनाळी ते कासेगाव या रस्त्यावरील ओढ्यावर पाणी आल्याने या गावचा संपर्क तुटला आहे.
पंढरपूर तालुक्याच्या उत्तर भागातील खर्डी, तनाळी, टाकळी, शेटफळ, तावशी, सिध्देवाडी, एकलासपूर, अनवली, राझणी, चिचुंबे, ओझेवाडी नेपतगाव, शिरगाव आणि कासेगांव या गावांमध्ये अनेक दिवसांपासून जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने मागील दोन दिवसांपासून विश्रांती घेतली होती. मात्र, शनिवारी या पावसाने पुन्हा जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. या पावसामुळे या भागातील ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Rain Alert: पुढील काही तासांत पावसाचं ‘महावादळ’; ‘या’ जिल्ह्यांना पाऊस नुसता धुवून काढणार
दरम्यान, कासेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व दौलतराव प्रशालेच्या बाजूला व प्रशालेच्या आतील मैदानावरही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. तसेच शेतातही पाणी साचल्याने शेताला ही तळ्याचे स्वरूप आले आहे. तर कासेगाव ते तनाळी या रस्तावरील ओढ्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे. त्यामुळे या रस्तावरून होणारी वाहतूक बंद झाल्याने या रस्त्यावरून या गावाचा संपर्क तुटला आहे. तर या परिसरातील फुगारे वस्तीजवळील सलगर वस्तीनजीक असणाऱ्या ओढ्यावरही पाणी आले आहे.
चाऱ्याचा प्रश्न गंभीर
अनेक दिवसांपासून पाऊस कोसळत असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. दिवसभर पाऊस पडत असल्याने अनेकांच्या घराला गळती लागली आहे. या गळतीमुळे घरांमध्ये पाणी साचले आहे. सतत पाऊस सुरूच असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड होऊन बसले आहे.
शालेय विद्यार्थ्यांचेही हाल
शाळकरी मुलांचे तर पावसामुळे अतोनात हाल होत असताना दिसत आहे. सततच्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने थंडी सुरू झाली आहे. पाऊस बंदच होत नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. साचलेले पाणी बाहेर काढणे अवघड होऊन बसले आहे. शेतातून पाणी बाहेर निघत नसल्याने नुकत्याच केलेल्या उसाच्या लागवडी पाण्याखाली बुडाल्या आहेत. तर कांदा, टोमॅटो यांच्यासह अन्य फळभाज्या पाण्याखाली गेल्याने शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या सर्व पिकांचे पंचनामे करून शासनाने त्वरित मदत द्यावी अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
दोन दिवसात पंचनामे सुरू?
पंढरपूर तालुक्यातील सर्व मंडलांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. या सर्व अतिवृष्टी झालेल्या मंडलातील पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिलेली आहेत. त्यामुळे आपल्या गावातील गावकामगार तलाठी व कृषी सहाय्यक हे येत्या दोन दिवसात पंचनामे करणार आहेत. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे जीपीएस फोटो व्हिडिओ काढून ठेवावे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.