
Rain News
अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात काही भागात पुन्हा ढगफुटीसदृश पाऊस झाला. या मुसळधार पावसानंतर रात्री पुन्हा मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे रुईखेड आणि अकोली जहागीर गावांमध्ये अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. रात्रभर गावकऱ्यांचे मोठे हाल झाले. गावातल्या रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आल्याचे दिसून आले. शेत शिवारातदेखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
मुंबई, पुण्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. जुलै महिन्यात अनेक ठिकाणी झालेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. यात घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसानही झाले आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातही रविवारपासून पावसाने जोर धरला आहे. दिवसभर मुसळधार पाऊस बरसला. त्यानंतर मध्यरात्री रात्रीही पावसाची बॅटिंग सुरू झाली. अनेक गावांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला.
यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा, भंडारा, अमरावती, अकोला या विदर्भातील जिल्ह्यांना मंगळवारपासून सलग चार दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.
काही पिके सडण्याची शक्यता
चिंचावले परिसरात पावसाचा जोर प्रचंड होता. या पावसाने वाटाणा, घेवडा, मका, बाजरी पिकात पाणीच पाणी साचून ती सडण्याच्या शक्यता निर्माण झाली आहे. तर अंजीर, सीताफळ बागेत देखील प्रचंड पाणी साचले आहे. बागेतील खते पूर्णपणे वाहून गेली आहेत. दुमेवाडीहून झेंडेवस्ती, लडकतवस्ती येथे जाणारा साकव पूल वाहून गेला.
पुलाला पडले भगदाड
पुणे-पंढरपूर पालखी महामार्गालगतच्या तानाजी झेंडे, चंद्रकांत झेंडे, दादा झेंडे, नारायण झेंडे यांच्या घरात पुराचे पाणी शिरले. त्यामुळे या नागरिकांनी रात्र जागून काढली. पवारवाडीनजीक पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावरील पुलाला भगदड पडले असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे वैजापूर शहरांमध्ये सुरू असल्या आठवणी बाजारात पाणी घुसल्याने बाजारपेठ ठप्प झाली तर काही प्रमाणात नुकसानही झाले. त्यासोबत यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच जोरदार पाऊस झाला.