मुंबई : महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. ठाणे जिल्ह्यामधील काही तालुक्यांमध्ये तर पावसाने मागील दोन दिवसांपासून जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. त्यामुळे पाण्याला जायला जागा नसल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. कल्याण-डोंबिवली शहरांच्या स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे. वाहनचालकांना, नागरिकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे.
काल रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे लोकल ट्रेनवर मोठा परिणाम झाला आहे. कर्जत-बदलापूरवरून येणाऱ्या लोकल ट्रेन या १० ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. त्याचबरोबर हार्बर, सेंट्रल, पश्चिम रेल्वे सेवा १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट सांगण्यात आला आहे. लोकल सेवा उशिराने असल्यामुळे प्रवाशांना कामावर जाण्यासाठी उशीर होत आहे.
महाराष्ट्रामध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे राज्यामधील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज पुण्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, त्याचबरोबर काही ठिकाणी पुण्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रामध्ये २५ जुलैपर्यत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील मुसळधार पावसामुळे सर्व नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्याचबरोबर सर्वाना फिल्डवर उतरण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पुढे ते म्हणाले की, पुण्याचे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, एनडीआरएफ आणि लष्कराचे कर्नल यांच्याशी मी बोललो आहे. तसेच याआधीच त्यांनी एनडीआरफच्या बोटी वैगरे रवाना केल्या आहेत. लष्कर देखील आता पुण्यात पोहचते आहे. तसेच वेळ पडल्यास बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितले.
कल्याण मलंग रस्त्यावरील द्वारली गावात जवळ रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या भागात काही शाळा असल्याने विद्यार्थ्यांची बस ,रिक्षा देखील वाहतूक कोंडीत अडकली आहे. एकतर रस्त्यावर खड्डे आणि त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.