Kokan Rain Update: कोकणाला धू-धू धुतलं; चिपळूण, रत्नागिरीत पाणी शिरले, सिंधुदुर्गमध्ये तर...
Kokan Rain Update: गेले काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोकणात तर पावसाने कहर केला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अति ते अति मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेले काही दिवस कोकण किनारपट्टीवर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे अनेक शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूण, राजापूर आणि रत्नागिरी या भागात पुराचे पाणी सखल भागात शिरले आहे.
चिपळूण तालुक्यात गेले चार ते पाच दिवस अति मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोळकेवाडी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने आणि पावसाचा जोर कायम राहिल्याने वशिष्ठी नदीचे पाणी चिपळूण बाजारपेठेतील सखल भागात शिरले आहे. चिपळूण बाजारपेठेत पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासन अलर्ट मोडवर आहेत. वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. सध्या नदीची पातळी 5.50 मीटर इतकी आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. रत्नागिरीत चिपळूण आणि राजापूर तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे अणुस्कुरा घाटात दरड कोसळली आहे. प्रशासनाने ही दरड तत्काळ हटवली आहे. राजापूर शहरात देखील काही प्रमाणात पुराचे पाणी शिरल्याचे समजते आहे.
कणकवली-आचरा रस्ता बंद
गेले दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची पाणीपातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यामध्ये १०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कणकवली-आचरा रस्ता वाहतुकीस बंद झाल्याने आठ ते दहा गावांचा संपर्क तुटला आहे. येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
Kokan Rain Update : मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत ; वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या दूथडी भरून वाहत आहेत. कुडाळ तालुक्याच्या माणगाव खोऱ्यातील २७ गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात अजूनही पावसाची संततधार कायम आहे.