सीना नदीने धारण केले रौद्ररूप; महापूर आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
मोहोळ / दादासाहेब गायकवाड : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. सध्या वरूणराजा सगळीकडेच बरसत असल्याने शेतकऱ्यांचे खूपच नुकसान होत आहे. सोलापूर जिल्ह्यासह सर्वत्र पडणाऱ्या पावसामुळे सीना नदीने रौद्ररूप धारण केल्याने सीना नदीला महापूर आला आहे.
गेल्या १५ ते २० दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे मोहोळ तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिलेला आहे. धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे आसपासच्या इतर नद्यातून येणाऱ्या पाण्यामुळे सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांना या पाण्याचा फार मोठा फटका बसला असून, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
हेदेखील वाचा : Solapur News : पुरात अडकलेल्या नागरिकांच्या बचावाला आणखी गती मिळणार; जिल्हाधिकाऱ्यांनी मनुष्यबळासह 11 बोटी मागवल्या
दरम्यान, काही ठिकाणी नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरले आहे. जनावरांचे ही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाण्याचा विसर्ग वाढतच राहिला असल्यामुळे मोहोळकडून सोलापूरकडे जाणारी एकेरी वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर सोलापूर पुणे हा महामार्ग पूर्णपणे बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी नदी काठी राहणाऱ्या सर्व गावकऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत व सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. सोलापूर-पुणे महामार्गाच्या वाहतूक पुलावर नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन देखील तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
सीना नदीने ओलांडली धोक्याची पातळी
मोहोळ तालुक्यातून वाहणाऱ्या सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, कधी नव्हे ते रौद्ररूप नदीने धारण केले आहे. त्यामुळे भयभीत झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणे गरजेचे आहे. या भागातील नदी लगत असणारी बोपले, मलिकपेठ, आष्टे, कोळेगाव, लांबोटी, नांदगाव येथील संपूर्ण पिके पाण्याखाली गेली आहेत. पुरामध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, वरचेवर सीना नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे.
बचावकार्यासाठी एनडीआरएफचे जवान दाखल
नदीपात्रामधून सुरक्षितस्थळी शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे जवान या ठिकाणी दाखल झालेले असून, सोमवार रात्रीपासून पाण्याची पातळी वरचेवर वाढतच आहे. सोमवारी संध्याकाळी आष्टे येथील काही शेतकऱ्यांना बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. प्रशासन दक्ष असून, मंडलाधिकारी तसेच तलाठी हे यंत्रणेची पाहणी करून अडचणीतील शेतकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शेतकरी वर्गाला मदत पुरविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे तहसीलदार सचिन मुळीक यांनी सांगितले.