पाटणबोरी परिसरात मुसळधार पाऊस
यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यात मागील काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे परिसरातील नदी, नाले दुथडी भरून वाहू लागल्याने ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत झाले आहे. यासह बाजारपेठेवर परिणाम झाला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.
संततधार पावसाने शेतातील उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या परिसरातून वाहणाऱ्या पैनगंगा व खुनीनदी या मागील काही दिवसांपासून दुथडी भरून वाहत आहे. थोड्या पावसाने सुद्धा बोरी मांडवी-वाऱ्हा कवठा हे मार्ग बंद होत आहे. त्याचा परिणाम अनेक गावातील सर्वच लोकांना व्यथा भोगाच्या लागत आहे. शेतकरी भाजी विक्रेता-विद्यार्थी, व्यापारी कर्मचाऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. परिणामी बाजारपेठ दिवसेंदिवस ठप्प होत आहे.
दरम्यान, शेतातील पिके पिवळी पडत असल्याने शेतकऱ्यासमोर पुढच्या भवितव्याचा प्रश्न पडला आहे. असाच पाऊस आणखी काही दिवस राहिल्यास शेतकऱ्यांच्या खरीप पिकावर मोठ्या प्रमाणात विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. या मुसळधार पावसाचा जनावरांना सुद्धा फटका बसत आहे.
पावसामुळे सर्वत्र चिखलांचे साम्राज्य
पावसामुळे सर्वत्र चिखलांचे साम्राज्य पसरले असून, चराई सुद्धा होऊ शकत नसल्याने त्याचा परिणाम दुधावर होत आहे. शेतातील अनेक कामे पूर्णतः थांबलेली दिसत असून, परिणामी पिकातील तण मात्र वाढत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. शेतातील कामे थांबल्याने विशेषतः महिला मजूर सुद्धा चिंतातूर झालेली आहे. शेतीच्या मजुरीवरच बचत गटाचे हप्ते भरल्या जात असल्याने महिलांना बचतगटाचे हप्ते कसे भरावे या चिंतेत महिला मजूर सापडल्या आहेत
निसर्गाच्या आपत्तीत अधिकारी कुठे?
या सर्व नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शासकीय अधिकारी व कर्मचारी मात्र पावसाच्या संकटापासून कुठे दडून बसले आहेत, हे जनतेला समजण्यास मार्ग नाही. निसर्गाची ही आपत्ती अजून किती दिवस सुरू राहील, याबाबतही प्रशासन अद्याप जनतेला स्पष्ट माहिती देऊ शकलेले नाही.