मुंबई : मुंबईसह, उपनगर आणि कोकणात पावसानं जोरदार हजेरी लावलीये. कोकणासह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुणे, नाशिक, नंदुरबार आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
५ जुलै रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात ३०-४० किलोमीटर प्रतितास वेगाने वादळ वारा व वीजेच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडेल. याचबरोबर ६ ते ७ जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन- तीन दिवसांपासून मुंबईत सलग पाऊस सुरू आहे. मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. मुंबई आणि कोकणासोबतच कोल्हापूर जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली. जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत अल्प पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरु झाल्यानं शेतकरी आनंदी झाले आहेत. दरम्यान, राज्याच्या अन्य भागातही पावसाची प्रतिक्षा कायम आहे.