
Pune Metro, Hinjawadi, PMRDA, Pune News, Infrastructure
सर्व तांत्रिक परवानग्या मिळूनही गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ या मार्गावर केवळ रिकाम्या चाचणी फेऱ्या सुरू आहेत. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित दौरा लांबणीवर पडल्यामुळे प्रत्यक्ष उद्घाटनाला पुन्हा नवा मुहूर्त शोधावा लागणार असून, केवळ सोहळ्याअभावी सज्ज मेट्रो प्रवाशांविनाच धावण्याच्या या प्रकाराबाबत सर्व स्तरांतून तीव्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या १७ स्थानकांना सुरक्षा आयुक्तांकडून प्रवासी वाहतुकीसाठी हिरवा कंदील मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातील दौऱ्यात या प्रकल्पाचे लोकार्पण करण्याचे नियोजन प्रशासनाकडून आखले गेले होते. ऐन दिवाळीनंतर आयटीयन्स आणि पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रशासकीय व पोलीस सूत्रांनुसार हा दौरा लांबणीवर पडल्याने नोव्हेंबरच्या सुरुवातीची अंतिम मुदतही हुकली आहे. परिणामी, ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत प्रत्यक्ष कधी दाखल होणार, हा प्रश्न पुन्हा अनिर्णित राहिला आहे.
मूळ आराखड्यानुसार ही मार्गिका गेल्या वर्षीच्या सुरुवातीलाच कार्यरत होणे अपेक्षित होते. वारंवार कामाला विलंब होत अखेर मार्च २०२६ ची डेडलाइनही हुकली. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने हस्तक्षेप करत सुरुवातीला १२ किलोमीटरचा टप्पा पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि ‘पुणे आयटी सिटी मेट्रो’ने पहिल्या टप्प्यातील १२ स्थानकांचे काम पूर्ण करून तपासणीही करून घेतली. मात्र, प्रवाशांची वाढीव उपयुक्तता लक्षात घेऊन ती थेट शिवाजीनगर जिल्हा न्यायालयापर्यंत सुरू करण्याचा निर्णय झाला आणि उर्वरित पाच स्थानकांची मंजुरी मिळवण्यात आली. तांत्रिक पूर्तता झाल्यावर ही सेवा सुरू होईल असे वाटत असतानाच विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे उद्घाटनाची गाडी पुन्हा रुळावरून घसरली होती.
प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने पीएमआरडीए आणि विकासक कंपनीवर सातत्याने दबाव आणला. मात्र, आता सर्व तांत्रिक आणि सुरक्षा मंजुऱ्या खिशात असताना केवळ औपचारिक उद्घाटनाच्या हट्टापायी लाखो नागरिकांना सेवेपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप होत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी तयार असलेल्या मार्गावर प्रवासी वाहतूक तातडीने सुरू करून, व्हीआयपींच्या वेळेनुसार औपचारिक सोहळा नंतरही पार पाडता आला असता, असा सूर वाहतूक तज्ज्ञ आणि नागरिकांमधून उमटत आहे.
Ans: सर्व तांत्रिक परवानग्या आणि CMRS प्रमाणपत्र मिळूनही व्हीआयपी (पंतप्रधान) यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनाचा दौरा लांबल्यामुळे ही सेवा प्रवाशांसाठी सुरू झालेली नाही.
Ans: हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या सर्व १७ स्थानकांना रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (CMRS) प्रवासी वाहतुकीसाठी अधिकृत मंजुरी मिळालेली आहे.
Ans: हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या लाखो आयटी कर्मचाऱ्यांना आणि स्थानिक पुणेकरांना भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.