मुंबई – : गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात दसरा मेळाव्यावरून तुफान राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. अखेर मुंबईच्या शिवाजी पार्कवर सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडत आहे. तर दुसरीकडे बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडत आहे.
काय म्हणाले ठाकरे
– देशातील लोकशाही राहते की नाही, हा गंभीर प्रश्न आहे. तुम्हाला सगळ्यांना सावधानतेचा इशारा देतोय. सगळे पक्ष संपणार आणि एकच पक्ष राहणार म्हणजे देश हुकूमशाहीकडे चालला आहे. ही गुलामगिरी तुम्हाला चालणार आहे का
– काश्मीरमधलीच ती एक घटना आहे. औरंगजेब नावाचा लष्करात एक गनमॅन होता. त्याचे अपहरण करण्यात आले. काही दिवसांनी त्याचे प्रत आपल्या सैन्याला मिळाले. त्याला हालहाल करून मारले. अतिरेक्यांनी त्याला मारले. तो भारताच्या बाजूने लढतोय म्हणून त्याला मारले. तो औरंगजेब आमचा भाऊ आहे. हे आमचे हिंदुत्व आहे.
– हिंदुत्व म्हणजे नेमके काय. तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी एकाच व्यासपीठावर यावे आणि सांगावे. शिवसेनाप्रमुखांनी सांगितले आमचे हिंदुत्व जानवे आणि शेंडीशी निगडीत नाही. शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा सांगितले. या देशावर प्रेम करणारा मुसलमान असला, तरी तो आमचा. प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा. घराबाहेर पडल्यानंतर देश हाच धर्म म्हणावा. मात्र, बाहेर येऊन कुणी मस्ती दाखवत असेल, तर आम्ही खरे हिंदुत्व दाखवू.
– पाकिस्तासमोर, चीनसमोर जाऊन शेपट्या घालायच्या. इकडे येऊन पंजा दाखवायचा ही तुमची मर्दुमकी. इकडे येऊन प्रकल्प पळवतायत. आम्हाला गुजराबद्दल आसूया नाही. मात्र, मोठमोठे प्रकल्प गुजरातमध्ये नेणे ही कितपद योग्य.
– अमित शहाजी आम्हाला जमीन दाखवाच. पाकिस्तानने बळकावलेली आमची जमीन एक इंच आणून दाखवा. मोदींच्या त्या मुलाखती आम्ही आजही ऐकतो. पाकला त्याच्याच भाषेत उत्तर देऊ. मात्र, पाकव्याप्त काश्मीरची एक इंचही जमीन तुम्ही घेऊ शकला नाहीत.
– हिंदुत्व हिंदुत्व करत गायी वरती बोलताय ना. मग महागाई वर बोला. ही गाई आठवू द्यायची नाही म्हणून हिंदुत्वाचा डोस. खरे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तात्रय होसबळे यांनी महागाईची आठवण करून दिली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन