फोटो सौजन्य - Social Media
दिघी-पुणे राष्ट्रीय महामार्गावर म्हसळा खरसई येथे भरधाव तीन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात दुपारी साधारण २.३० वाजण्याच्या सुमारास घडला. घटनेची माहिती मिळताच म्हसळा पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि खासगी रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना उपचारासाठी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात युनिकॉन मोटरसायकल चालवणारा रुपेश कृष्णा वासकर (वय २७, रा. कुडगाव) हा गंभीर जखमी झाला होता. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. रुपेशच्या दुचाकीवर बसलेली पाभरे येथील कुमारी चंदा काशिनाथ वेटकोळी (वय २३) हिला गंभीर दुखापत झाली आहे.
दरम्यान, म्हसळ्याहून मेंदडीकडे जाणाऱ्या ट्रिपल सीट दुचाकीला देखील या अपघाताचा मोठा फटका बसला. या दुचाकीवरील प्रकाश भिकुबा वाघमारे (वय २०), वसंत भिकुबा वाघमारे (वय २२) आणि कल्पेश हरिश्चंद्र हिलम (वय २३) हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या शरीराला खोल जखमा झाल्या असून, त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत. अपघाताच्या वेळी या दुचाकीवरील तिघेही वेगात प्रवास करत होते, त्यामुळे धडकेनंतर त्यांना जोरदार धक्का बसला. याशिवाय, कुडगावहून म्हसळ्याकडे जाणाऱ्या स्कूटीवर असलेला राहुल गोविंद पाटील (वय ३१) देखील या अपघातात सापडला. त्याला किरकोळ दुखापत झाली असून, प्राथमिक उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले आहे. मात्र, अपघाताचा मोठा धक्का बसल्याने तो मानसिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. काही वेळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. स्थानिक नागरिकांनीही जखमींना मदत करत त्यांना रुग्णालयात पोहोचवण्यास हातभार लावला. अपघाताची माहिती मिळताच म्हसळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना तातडीने म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यातील चौघांना पुढील उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालय आणि पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
अपघाताची नोंद म्हसळा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक तपासात दुचाकींचा अतिवेग आणि चुकीच्या दिशेने वाहन चालवणे हे कारण असल्याचे दिसून येत आहे. अपघाताचे नेमके कारण आणि जबाबदार कोण, याचा तपास सपोनी संदीप कहाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी महामार्गावर वेगमर्यादेचे काटेकोर पालन व्हावे आणि वाहतूक पोलिसांनी या मार्गावर अधिक कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.