Maratha Reservation : मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आंदोलकांची तूफान गर्दी; वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावर केले जात आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हजारो मराठा बांधव आझाद मैदानावर दाखल होत आहे. यावेळी मराठा आंदोलकांची तूफान गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहिला मिळत आहे.
लातूर, पुणे, सांगलीसह धुळ्यातून शेकडो मराठा आंदोलक रेल्वेने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही व आमच्या इतर मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत आता माघार घेणार नाही. आमचे हे आंदोलन चालूच राहील, अशी ठाम भूमिका मराठा आंदोलकांनी यावेळी घेतली आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला तापला आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे कूच केली आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी येथून निघालेले मनोज जरांगे पाटील हे आपल्या समर्थकांसह दोन दिवसांनंतर शुक्रवारी सकाळी मुंबईत धडकले आहेत.
दरम्यान, ट्रक, टेम्पो, जीप आणि चारचाकींतून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने आले आहेत. मुंबईत गुरुवारी दुपारपासूनच आंदोलकांची गर्दी सुरू झाली. मनोज जरांगे यांच्या ताफ्यात शेकडो वाहने असून, मराठा आंदोलकांच्या वाहनांची मुंबईच्या रस्त्यावर जवळपास 5 किलोमीटरपर्यंत रांग लागल्याची माहिती आहे. मुंबईच्या वेशीवर येताच जरांगे पाटील यांचे फटक्यांची आतिषबाजी आणि भलामोठा हार घालत जंगी स्वागत करण्यात आले.
जरांगेंना केवळ एकाच दिवसासाठी आंदोलनाची परवानगी
मराठा समाजाचे लोक मुंबईत आले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे. यासाठी ते आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. मात्र, पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना केवळ एकाच दिवसासाठी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे.