I got Padma Shri only because of my black mother - statement of Rahibai Popare
वर्धा : शेतीशी नाळ जुळलेली असल्याने जमिनीचा पोत सुधारण्याकरिता शेणखत व जैविक खताचा वापर वाढविला. जमिनीची प्रत सुधारल्याने उत्पन्नही वाढले, काळ्या आईमुळेच मला पदमश्री पुरस्कार मिळाला, असे प्रतिपादन मुख्य अतिथी पद्मश्री राहिबाई पोपेरे यांनी केले.
दत्ता मेघे फाऊंडेशन तसेच वर्धा सोशल फोरम व कृषी विभाग वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने सेलू व वर्धा जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मोफत बी-बीयाणे वाटप कार्यक्रम साजरा झाला. सदर कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून पद्मश्री राहिबाई पोपेरे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ऊसतोड कामगार म्हणून आयुष्याची सुरुवात केली. शिक्षण नव्हते, त्यामुळे लिहता-वाचता येत नव्हते. परंतु, समाजात काहीतरी चांगलं काम करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होत. पण, शिक्षण आड येत असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मी राहते तो भाग अतिशय दुर्गम असून, पाण्याची सुद्धा सोय नसल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार तर विशेष अतिथी म्हणून डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, मनीषा मेघे, सोशल फोरमचे अध्यक्ष डॉ. अभ्युदय मेघे, सचिव अविनाश सातव उपस्थित होते. सदर कार्यक्रमांत सेलू व वर्धा जिल्ह्यातील ५६ आत्महत्या शेतकरी कुटुंबियांच्या सदस्यांनी मोफत बी-बियाण्यांचा लाभ घेतला. सोबतच देवळी व आर्वी तालुक्यातील एकूण ३० कुटुंबीयांनीसुद्धा बी-बियाण्याचा मोफत लाभ घेतला. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. अभ्युदय मेघे यांनी केले.
कार्यक्रमामध्ये पद्मश्री राहिबाई पोपेरे यांचे मानपत्र मनीषा मेघे यांनी वाचून त्यांचे मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सोशल फोरमचे सहसचिव श्याम परसोडकर, चंदू राठी, रवींद्र टप्पे, चेतन काळे, सुशांत वानखेडे, श्याम लंगडे, मोहीत सहारे, नीलेश ठाकरे, प्रवीण ढोकणे, पंकज अडेकर, अभिजित वानखेडे, नितीन चामलाटे, प्रफुल्ल गायकवाड, मंदार ठाकरे, वैभव बारहाते, समीर गावंडे, प्रवीण भोयर, विनोद दुधकोहाळे यांनी सहकार्य केले.