कणकवली शहरातील उड्डाणपुलाखाली ट्रक, डंपरसह विविध वाहनांची अवैध पार्किंग
मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली शहरात उड्डाणपूल बांधण्यात आलं आहे. मात्र या उड्डापुलाखालील स्थिती अत्यंत त्रासदायक आहे. डंपर, ट्रक, कार, जेसीबी, टॅक्टर यासह विविध अवजड वाहनांची पार्किंग या उड्डाणपुलाखाली करण्यात येत आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाखाली चिखल व कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झालं आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढण्याबरोबरच रोगराईचा प्रसार देखील होत आहे. या उड्डाणपुलाखाली होत असलेल्या अवैध्य पार्किंगवर महामार्ग प्राधिकरणाने कारवाई करावी , अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
हेदेखील वाचा- अनेक वर्षापासून नादुरुस्त गटाराचे काम शिवसेना पदाधिकाऱ्याने स्वखर्चातून केलं! नागरीकांनी मानले आभार
महामार्ग उड्डाणपुलाच्या खाली चिखल व कचऱ्यामुळे अस्वच्छता वाढत आहे. सध्या पावसाळा सुरू असून या उड्डाणपुलावरून खाली कोसळणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे उड्डाणपुलाखाली ते पाणी साचून चिखल तयार झाला आहे. उड्डाणपुलाखाली पाणी कोसळत असल्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या उड्डाणपुलाच्या खालील जागेचे सुशोभीकरण करण्याची मागणी नागरीकांकडून केली जात आहे.
याबाबत गेल्या काही वर्षापूर्वी कणकवली नगरपंचायतने सुशोभीकरणाचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे पाठविला होता, या प्रस्तावात उड्डाणपुलाखाली छोटे बगीचे, मॉर्निंग वॉकसाठी ट्रॅक, शौचालय तसेच जागा उपलब्धतेनुसार पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र यावर महामार्ग प्राधिकरणकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसून सर्वसाधारण नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
हेदेखील वाचा- कल्याणमध्ये शाश्वत पर्यावरणासाठी युवकांची वृक्षारोपण मोहीम; जांभुळ आणि पेरूच्या रोपांचं वृक्षारोपण
उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात फळ, भाजी विक्रेते, कापड व्यवसायिक, चहा पानटपरी असे व्यवसाय सुरु आहेत. महामार्ग रुंदीकरणात 200 ते 250 स्टॉलधारक विस्तापित झाले होते, त्यांचे अद्यापही पूर्नवसन न झाल्याने या स्टॉलधारकांनी उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागेत आसरा घेतला आहे. अनेकांना उपजीविकेसाठी उड्डाणपुलाखालील जागेचा उपयोग होताना दिसत आहे. याबाबत कणकवली नगरपंचायतने ठोस निर्णय घेवून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या उड्डाणपुलाखाली अनेक ठिकाणी पार्किंग, कचरा, अतिक्रमणाचे साम्राज्य पसरले आहे. कुजलेल्या कचऱ्यातून येणारी दुर्गंधी व त्यावर वावरणारे भटके श्वान, डास, माशांमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. परिसर मोठ्या प्रमाणात विद्रूप होऊन बकालपणा वाढला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण झाले आहे. मात्र, कणकवली शहरातील मुख्य चौक हा अप्पासाहेब पटवर्धन चौक म्हणून ओळखला जातो. या चौकाचे सुशोभीकरण करून अप्पासाहेब पटवर्धन यांच्या स्मृतींना उजाळा देत होणे आवश्यक आहे.
कणकवली शहरात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. या उड्डाणपुलाखाली सुशोभिकरण झाल्यास पर्यटकांसह नागरीकांना विरंगुळ्याचे ठिकाण होईल. त्या दृष्टीने महामार्ग प्राधिकरण, कणकवली नगरपंचायत आणि स्थानिक लोकप्रतिनीधी उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.