
जत : जत तालुक्यातील काही भागात हॉटेल व धाब्यावरील जेवणाच्या माध्यमातून व्यवसाय झाला नाही तरी देशी विदेशी दारू विक्री मात्र जोमात सुरू असल्याचे चित्र दिसून येते, या अवैद्य दारू विक्रीवर पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत साशंकता दिसत आहे. कारवाईसाठी आलेल्या एक्साईजच्या पथकाला गुंडाळण्यात येत असल्याने हा प्रकार उघडपणे सुरू असल्याचे बोलले जात आहे.
जतसह पूर्व भागात यापूर्वी देशी- विदेशी दारू विक्री ही काही पानटपरी व दुकानांमध्ये सुरू असल्याचे उघड आहे. आता काही हॉटेल व ढाबे हे खाद्यपदार्थ भोजना ऐवजी दारूची तल्लफ भागविण्यासाठी प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्याकडे युवकांसह मध्यपिंची वर्दळ वाढत आहे. संबंधित ठिकाणी दाखवण्यापूर्ती कारवाई केली जाते. त्यामुळे कारवाई फार्स ठरत नाही. राजरोसपणे दारू विक्री सुरू असल्यामुळे पोलीस व उत्पादन शुल्कच्या कारवाईबाबत साशंकता व्यक्त होत आहे. सहजपणे हॉटेल व ढाब्यावर दारू मिळू लागल्याने युवक व्यसनाधीनतेकडे वळत आहेत.
बनावट दारूची चलती
अनेक ठिकाणी बनावट दारूची विक्री सर्रासपणे सुरू आहे. युवा पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. यावर ठोस उपाय म्हणजे अवैद्य दारू विक्रीवर ठोस कारवाईची गरज आहे. ढाब्यावर दारू पिताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. जिल्ह्यात मात्र अशी कोठेही कारवाई झाली नाही. उलट पथकाच्या समोर हे प्रकार सुरु असल्याने दंडाची वसुली होतच नाही.
कारवाई सुरू हाेण्याची आवश्यकता
ग्रामीण भागातील ढाब्यावर जेवण कमी आणि मद्यपींची सोयच अधिक केली जात असल्याचे चित्र आहे. अगदी शहरातील काही ढाब्यांवर पडदे लावून मद्यपींची खास सोय करण्यात येत आहे. वरिष्ठाकडून आलेले ‘टार्गेट’ पूर्ण करण्यात उत्पादन शुल्कचे अधिकारी नेहमी प्राधान्य देतात. मात्र, अवैध व्यवसायावर कारवाई होत नाही. जिल्हाभर वाढत चाललेल्या या प्रकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी कारवाई सुरु होणे अपेक्षित आहे.