महाराष्ट्रावर घोंघावतेय मोठं संकट! राज्यात पाऊस थैमान घालणार; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना 'हे' आवाहन
1. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
2. शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन
3. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
मुंबई: सप्टेंबरमध्ये बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून 28 तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या आठवड्यात पाऊस परत सक्रिय होणार आहे, ज्यामुळे किमान 30 सप्टेंबरपर्यंत तरी राज्यातून पाऊस निरोप घेण्याची शक्यता नाही. सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार 22 ते 25 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये मेघ गर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने दुपारनंतर पडेल. कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव 26 तारखेपासून जाणवण्याची शक्यता आहे. यादिवशी विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिणेकडे असलेल्या भागांमध्ये दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे.
27 तारखेला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसात वाढ होऊ शकते, आणि यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊसदेखील पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 28 तारखेला राज्यातील पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
राज्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाचा मोठा फटका; छत्रपती संभाजीनगरसह विभागात 10 मंडळात अतिवृष्टी
राज्यात स्थिती काय?
धाराशिव जिल्ह्यात (परांडा तालुक्यातील मौजे लाची) येथे झालेल्या पावसामुळे १२ नागरिक अडकले होते. या नागरिकांच्या मदत व बचाव कार्यासाठी नाशिकवरून एअर फोर्सचे हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले आहे आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) पुणे येथील एक पथक रवाना करण्यात आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, जामखेड, कर्जत तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) पुणे आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) धुळे येथील एक पथक पाठवण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यात नदीला आलेल्या पुरामुळे (सिंदफना नदी परिसर) या ठिकाणच्या नागरिकांना मदत व बचाव कार्यासाठी नगरपालिका बीड यांच्याकडील बोट पाठविण्यात आली. तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) पुणे एक पथक शोध व बचाव कार्यासाठी पाठवण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यात सिना आणि भोगावती नदीला आलेल्या पुरामुळे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) चे एक पथक रवाना व नगरपालिका बार्शी अग्निशमन दलाची बोट घटनास्थळी पाठविण्यात आली आहे. तसेच सीना नदीकाठच्या सर्व नागरिकांना राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सचेत ॲप मधून सतर्कतेचा संदेश देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील चार गावे पूरग्रस्त असून हिवरा नदीला पूर येण्याची शक्यता असल्याने मदत व बचाव कार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक पाठवण्यात आले आहे.