राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे नुकसान; सोलापुरात पालकमंत्री गोरेंनी दिले महत्त्वपूर्ण निर्देश (संग्रहित फोटो)
सोलापूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असून, ९१ महसुली मंडळापैकी ४३ महसुली मंडळात अतिवृष्टी झाली आहे. उजनी व सीना नदीमधून पाणी सोडल्याने अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे, घरांचे, गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचेही नुकसान झालेले आहे. तरी प्रशासकीय यंत्रणांनी नुकसानीचे पंचनामे अत्यंत गतिमान पद्धतीने व ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलेल्या ठिकाणचे १०० टक्के पंचनामे करून त्याचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश राज्याचे ग्राम विकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस शहर आयुक्त एम. राजकुमार, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासह प्रांताधिकारी व सर्व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अतिवृष्टीने व पुरामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणेकडून सुरू असलेल्या पंचनाम्याची माहिती दिली. सर्व स्थानिक प्रशासकीय यंत्रणेला वेगाने पंचनामे करून त्वरित अहवाल सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले असल्याची माहिती दिली.
महापालिका आयुक्त ओंबासे यांनी शहरात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्याची कार्यवाही पूर्ण होत आल्याचे सांगून या अनुषंगाने कायमस्वरूपी उपाययोजनाबाबतही सविस्तर प्रस्ताव लवकरच दिला जाईल, असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अतिवृष्टीने झालेल्या रस्ते, शासकीय इमारती, शाळा इमारत याबाबतचे पंचनामे करून अहवाल लवकरच सादर केला जाईल असे सांगितले. यावेळी महसूलचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
कोणत्याही प्रकारची तडजोड चालणार नाही
पालकमंत्री गोरे म्हणाले, जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेती पिकांचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासकीय यंत्रणेने त्वरित पंचनामे करावेत. एकही शेतकरी व नागरिक पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, अशा ठिकाणचे सरसकट पंचनामे करावेत, यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड चालणार नाही. अशा ठिकाणचे पंचनामे राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रांताधिकारी यांची राहील, असेही त्यांनी निर्देशित केले.
हेदेखील वाचा : IMD Heavy Rain Alert: अरे बाबा आता थांब रे! उत्तराखंडमध्ये पाऊस करणार कहर; तर ‘या’ राज्यांमध्ये…