छत्रपती संभाजीनगरसह विभागात १० मंडळात अतिवृष्टी (Photo : Social Media)
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. एकीकडे नुकसानीचे पंचनामे सुरु असताना दुसरीकडे अतिवृष्टीचा कहर सुरुच आहे. आता परतीचा पाऊस सुरु झाला आहे. गुरुवार ते शुक्रवार दरम्यान 24 तासांत विभागातील सात मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली होती. त्यानंतर शुक्रवार ते शनिवार या 24 तासात पुन्हा विभागातील दहा मंडळात अतिवृष्टीचे नोंद झाली आहे. यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील 3 मंडळांसह धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा समावेश आहे.
मुसळधार पावसामुळे पिके पाण्यात गेली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. विभागात अतिवृष्टीचे सत्र सुरूच आहे. बहुतेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. मागील आठवडाभरापासून विभागातील अनेक मंडळात अतिवृष्टी सुरु आहे. या अतिवृष्टीमुळे, पुरामुळे लाखो हेक्टरवरील पिकांना जबर फटका बसला आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरु असतानाच दुसरीकडे पडणाऱ्या दमदार पावसामुळे बाधित क्षेत्रात भरच पडत असल्याचे चित्र आहे.
हेदेखील वाचा : IMD Heavy Rain Alert: अरे बाबा आता थांब रे! उत्तराखंडमध्ये पाऊस करणार कहर; तर ‘या’ राज्यांमध्ये…
दरम्यान, विभागीय आयुक्तालय प्रशासनाकडून प्राप्त अहवालानुसार, गेल्या 24 तासात मराठवाड्यात ८.४ मिमी पावसाची नोंद झाली. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २.७ मिमी, जालना ५.३ मिमी, बीड जिल्ह्यात ६.६, लातूर १२.४ मिमी, धाराशिव ७.४ मिमी, नांदेड ७.४ मिमी. पाऊस झाला.
संभाजीनगरच्या तीन मंडळात बॅटिंग
शुक्रवार ते शनिवार या 24 तासांत देखील मुसळधार पावसाने संभाजीनगरसह विभागाला झोडपून काढले. शुक्रवारी सायंकाळी पाचनंतर वातावरणात बदल होऊन सुरुवातीला रिमझिम व नंतर अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसाने जोरदार बॅटिंग केली. या हंगामातील मोठ्या पावसापैकी हा एक असल्याचे बोलले जात आहे.
दहा मंडळात अतिवृष्टीची नोंद
संभाजीनगर जिल्ह्यातील ३ मंडळांसह विभागातील एकूण दहा मंडळात अतिवृष्टीची नोंद केली आहे. या २४ तासात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १३. ५ मिमी, जालना १०. ५, बीड ८. २, लातूर १३. ५, धाराशिव १३. ४. नांदेड ३.८, परभणी ७. ८ तर हिंगोली जिल्ह्यात २१. ४ मिमी असे विभागात एकूण ११. ४ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातून मिळाली आहे.