पुणे: हवामान विभागाने राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. गेले दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस कोसळत आहे, कडक उन्हाळ्यात पाऊस आल्याने काही ठिकाणी थंडावा निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासाह पाऊस झाल्याने व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान पुन्हा एकदा राज्याला अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे.
04 अप्रैल के लिए मौसम की चेतावनी#imd #india #shorts #weatherupdate #thunderstorm #hailstorm #Heatwave #rainfall @moesgoi @ndmaindia @DDNational @airnewsalerts pic.twitter.com/Zzeqwrgl5Z
— India Meteorological Department (@Indiametdept) April 3, 2025
राज्यातील अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्याचा पाऊस, गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने राज्यातील 8 जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केला आहे. ढगांचा गडगडाट आणि वीजांचा कडकडाट होऊन पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
आज पुणे-पिंपरी चिंचवड शहराला जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. तर पुढील काही तासांमध्ये पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे बळिराजाचे मोठे नुकसान झाले आहे.
पुण्याला पावसाने झोडपले
गेले तीन ते चार दिवस पुण्यात देखील ढगाळ हवामान दिसून येत होते. आज अखेर पुण्यात पावसाने हजेरी लावली आहे. पुण्याच्या विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडलेली पाहायला मिळाली. पावसाच्या सरी कोसळल्याने मातीचा छान सुगंध दरवळत होता.
जवळपास पुणे शहर आणि उपनगर या भागात पावसाने काही काळ हजेरी लावली. अचानक पाऊस आल्याने दुचाकीवरून जाणाऱ्या प्रवाशांना रस्त्याच्या बाजूला थांबून आसरा घ्यावा लागला. अजूनही काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी वीजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासाह पाऊस सुरू आहे. सदाशिव, शुक्रवार, नवी, नारायण पेठ भागात अजूनही पाऊस सुरू आहे.
Pune Rain Update: पुण्याला पावसाने झोडपले; पेठ भागात जोरदार हजेरी, नागरिकांची त्रेधातिरपीट
अवकाळी पावसाचा आंबा, काजूच्या बागांना मोठा फटका
रत्नागिरी जिल्हयावर वादळी वाऱ्यांची निर्मिती झाल्याचे म्हटले जात आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकणात अवकाळी पाऊस पहायला मिळणार आहे. कोकण विभगाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी तयार झालेले आंबे झाडावरून तुटून गेले आहेत. लहान लहान कैरी देखील गळून पडल्या आहेत. ढगाळ आणि पावसाळी वातावरण झाल्याने आंब्यावर काळे डाग पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.