जळगाव : जिल्ह्यात होणारी वीजगळती व इतर कारणांमुळे होत असलेला तोटा भरून काढण्यासाठी महावितरणच्या प्रस्तावित दरवाढीस वीज नियामक आयोगाने मंजूर दिली. त्यामुळे 1 एप्रिलपासून ही दरवाढ लागू झाली असून, भर उन्हाळ्यात व राजकीय रणधुमाळीत महावितरणने ग्राहकांना शॉक दिला आहे.
वीज दरवाढीसोबतच स्थिर आकारातही वाढ करण्यात आल्याने घरगुती वीज ग्राहकांचे बिल १० ते २५ टक्के वाढणार आहे. दरवाढीचा हा शॉक घरगुती ग्राहकांसह कृषी, व्यापारी व औद्योगिक अशा सर्वच वीजग्राहकांना बसणार आहे. त्यातच जिल्ह्याचे तापमान ४१ अंशावर जात असून, उन्हाचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे एक एप्रिलपासून वीज दरवाढीचा ‘शॉक’ बसणार आहे.
दहा टक्केचा बोजा
राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार, महावितरणच्या वीजबिलात सरासरी साडेसात टक्क्यांची वाढ केली आहे. स्थिर आकारातही १० टक्के दरवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे. कृषी ग्राहकांसाठी वीजदर प्रति युनिट ४.१७ रुपयांहून ४.५६ रुपये इतका करण्यात आला आहे. तर कृषी इतर वापरासाठी वीजदर ६.८८ रुपये इतका आहे. गेल्या वर्षी तो ६.२३ रुपये होता. गेल्या वर्षातील तुलनेत कृषीसाठी ३८.१८ व कृषी इतरांसाठी ४८.२८ टक्के आहे.