farmer waiting for rain
वालचंदनगर : इंदापूर तालुक्यात सप्टेंबर महिना उजाडला तरीही पेरणीयोग्य पाऊस पडला नसल्याने खरीप पेरणी अद्याप झालेली नाही. तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील वालचंदनगर , रणगांव, कळंब परिसरातील शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्यावर खरीपाच्या पेरणीतील सोयाबीन, मका, पेरणी केली आहे. परंतु विहिरीच्या पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत गेल्यामुळे विहिरीही कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पिकांना योग्य पाणी उपलब्धता मिळाले नसल्याने पिके करपून गेली आहेत. त्वरित इंदापूर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहिर करण्यात यावा, अशी मागणी तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील शेतकरी करीत आहेत.
इंदापूर तालुक्यात जून महिन्यापासून कसलाही पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांनी बी-बियाणे खरेदी करून ठेवले होते. पालखी परत फिरल्यानंतर पाऊस पडेल, या अपेक्षेने हिंम्मत शेतकरी धरून बसले होते . पावसाचा चुकीचा अंदाज हवामान खात्याचा ठरत गेल्यामुळे शेतकरी खरीपाच्या पेरणीपासून वंचित राहिला आहे. काही शेतकऱ्याने विहिरीच्या पाण्याच्या जोरावर सोयाबीन, मका, जनावरांच्या चारा यासाठी ज्वारी पेरण्यात आली होती. परंतु विहिरीतच पाणी राहिले नसल्याने पिके जळून खाक झाली आहेत. राज्यात काही भागात दुष्काळ जाहीर करण्यात आला असला तरी इंदापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांना ७२ दुष्काळाच्या झळा सहन करण्याची वेळ आलेली आहे. या भागातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्वरित तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहिर करण्यात यावा, अशी मागणी वालचंदनगर रणगांव कळंब भागातील शेतकऱ्यांतून होत आहे.