छत्रपती संभाजीनगर : गोदावरी विकास महामंडळ-सिंचन विभाग, लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण, नांदूर मधमेश्वर कालवा या विभागातील अधिकाऱ्यांनी सन २०२१ ते २०२४ या काळात कोट्यवधींचा घोटाळा केला. या घोटाळ्याची चौकशी करण्यास टाळाटाळ केली जात असून, अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करत रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने सिंचन भवन समोर उपोषणाला सुरूवात केली.
रिपब्लिकन सेनाचे जिल्हाप्रमुख जयकिशन कांबळे यांचे सोमवार २६ फेब्रुवारीपासून सिंचन भवनासमोर उपोषण सुरू आहे. २०२१ ते २०२४ या ३ वर्षांच्या काळात टेंडर काढणे, अंदाजपत्रके, बोगस बिल, गेट दुरुस्ती, गार्डन दुरुस्ती, कालवा दुरुस्ती, कालवा बांधकाम दुरुस्ती, भूविकास कामे, सर्वेक्षण अशा प्रकारच्या कामातून बोगस निविदा मॅनेज करून आपल्या मर्जीतील ठेकेदारांना दिली आहेत.
तसेच खोटी बिले रेकॉर्ड करत बिले उचलत आहेत, असा आरोप जयकिशन कांबळे यांनी केला आहे. त्यामुळे या विभागाची शासनाकडून सीबीआय, एसीबीकडून चौकशी करण्यात यावी यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता. परंतु, कुठल्याही प्रकारची चौकशी अद्यापपर्यंत न करता संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत का? असा सवाल करण्यात येत आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्यास टाळाटाळ केली जात असून, अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जात आहे.