नाशिक : लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला आहे. मोदी सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाल्यानंतर हा पहिला अर्थसंकल्प असल्यामुळे सर्वांच्या अपेक्षा लागल्या होत्या. यामध्ये आंध्र प्रदेश आणि बिहार राज्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण तरतूदी करण्यात आल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली.
जयंत पाटील यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘महाराष्ट्राला अपेक्षा होत्या पण त्यात काही विशेष असे दिसले नाही. भाजपने तोंडाला पाने पुसली आहेत. कोणत्याही ठिकाणी महाराष्ट्राचा उल्लेख नाही. आंध्रप्रदेश आणि बिहारचे आमदार सोबत राहावे यासाठी खैरात वाटण्यात आली. देशात नवा बॅकलोक करण्यात येतोय. महाराष्ट्राला केंद्र सरकारने निग्लेट करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांसाठी काहीही नाही एकच योजना आहे. ‘लँड रेकॉर्ड’साठी एक योजना दिसत आहे.
बजेटमधील घोषणा वाऱ्याची वरात आहे. शेतकऱ्यांसाठी एखादी पॉलिसी अशी पाहिजे होती, केंद्र सरकार निर्यातीवर बंदी आणणार नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भुर्दंड बसलाय, त्यांना काहीही मिळाले नाही. सरकार टिकवण्यासाठी आंध्र आणि बिहारला योजना दिल्या आहेत. बेकारीचे दर वाढला आहे. आता त्यावर योजना काढत आहेत तर त्याला उशीर झाल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.