मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) निवडून आलेल्या खासदारांमध्ये बहुसंख्य उमेदवार नवे चेहरे होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देखील नव्या चेहऱ्यांना पक्ष संधी देणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित खासदारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत 8 पैकी अमर काळे, बजरंग सोनावणे, अमोल कोल्हे, बाळ्यामामा म्हात्रे, धैर्यशील मोहिते पाटील, भास्कर भगरे हे सहा खासदार उपस्थित होते.
सुप्रिया सुळे आणि नीलेश लंके हे नियोजित कार्यक्रम असल्याने येऊ शकले नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. आमच्या पक्षात निवडून आलेल्या 8 खासदारांपैकी बहुतांश खासदार नवे चेहरे आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही अधिकाधिक नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
लोकसभा निवडणुकांमध्ये आमची तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह होते. तर निवडणूक आयोगाकडे त्या चिन्हांशी काहीसे साम्य असलेल्या पिपाणी हे खुले चिन्ह होते. या दोन चिन्हांतील गोंधळाचा फटका आम्हाला काही ठिकाणी बसला. परिणामी, पिपाणीला दीड लाख मते गेली असून, साताऱ्याची सीट पडण्यास हे चिन्हच कारणीभूत आहे.
साताऱ्यात पिपाणी चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवाराला 37 हजार मते मिळाल्याने आमचा उमेदवार पराभूत झाला, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.