सातारा : ज्याप्रमाणे माशाला पाण्याबाहेर काढल्यानंतर त्याची तडफड होते, तसे काही लोक सत्तेत नसले की त्यांची चांगलीच तडफड होत आहे. त्यामुळेच कोण, कुठे, कुठल्या पक्षात जाते हे मला माहीत नाही. जे असा प्रयत्न करत आहेत. त्यांनी प्रत्यक्ष निवडणुका लढवून थेट निवडून येऊन दाखवावे, असे खुले आव्हान आमदार जयकुमार गोरे यांनी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांना त्यांचा नामोल्लेख टाळून दिले.
शासकीय विश्रामगृहामध्ये भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रदेश कार्यकारिणीच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सुवर्णा पाटील, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेट, शहराध्यक्ष विकास गोसावी, विजय काटवटे तसेच कार्यकारिणीचे सर्व ज्येष्ठ सदस्य यावेळी उपस्थित होते.
या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना आमदार जयकुमार गोरे म्हणाले, यंदा देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. त्यामुळे हर घर झंडा अभियान देशभर राबवण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला असून, त्या पद्धतीने सातारा जिल्ह्यातही याचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील मंडल प्रमुख, बुथ प्रमुखांची यादी मागवण्यात आली असून, त्यांना झेंड्याचे वितरण केले जाणार आहे. या अनुषंगाने कार्यकारिणीच्या प्रत्येक सदस्याला जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक घरांमध्ये झेंडा कसा पोहोचेल हे अभियानाचे मुख्य सूत्र असणार आहे. नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रवाद याची भावना वाढीस लागावी याकरिता हा केंद्राने उपक्रम निर्देशित केल्याचे गोरे यांनी सांगितले.