मुंबई आणि संपूर्ण राज्यभरात मराठा आंदोलनाने तीव्र स्वरुप धारण केलेलं आहे. सध्या मुंबई आणि उपनगरात मराठा समाजाचं रास्ता रोको आंदलन सुरु आहे. मराठा समाजाच्या या लढ्याला इतर समाजातील घटकांनी देखील आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. अशातच आता याबाबत आणखी एका वादाला तोंड फुटलं आहे. मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे कल्याण डोंबिवली मनसे सचिव अरुण रामचंद्र जांभळे यांनी परखड शब्दांत जरांगेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.
सन्माननीय श्री मनोज जरांगे पाटील आपण लढा उभारला चांगली गोष्ट आहे आम्ही आदर करतो या गोष्टीचा, पण सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या वर बोलण्या इतकं अजुन आपलं व्यक्तिमत्त्व मोठं नाही. जेव्हा मराठा समाजाला सर्व गोष्टी समजतील तेव्हा ज्यांनी आपल्याला डोक्यावर घेतले आहे ते डोक्यावरुनच फेकून देतील. जर शिंदेंना बोलल्याचा राग तुम्हाला येतोय तर तेव्हा वाशीला झालेल्या आदेशाचे पुढं काय झालं हे एकदा आम्हा मराठ्यांना कळु तर द्या. इथुन जे गुलाल उधळून जल्लोष साजरा केला मग त्याचं काय झालं हे पण आम्हाला कळुद्या. कोणी बोलत नाही याचा अर्थ तोंडाला येईल ते बोलू नका सन्मान करतो याचा अर्थ आमच्या नेत्यांचा अनादर खपवून घेण्याची परवानगी देत नाही आपल्याला.मराठा समाजाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि मराठा समाजाने पण आता एकदा विचार कराच या गोष्टीचा. आपल्या आंदोलनाला शुभेच्छा आहेत.धन्यवाद! टीप- मी एक ९६ कुळी मराठाच आहे पोस्टवर येऊन जास्तीचा शहाणपण शिकवण्याचा इतरांनी प्रयत्न करु नये. कधी कधी आरसा दाखवलेला चांगलाच असतो. अशा शब्दांत अरुण जांभळे यांनी जरांगेंना खडेबोल सुनावले आहेत.
शनीवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांना मराठा समाजाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते त्यावेळी ठाकरेंनी सांगितलं की, याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच जास्त देतील. मागच्या वेळी नवी मुंबईला जाऊन प्रश्न सोडवला असता ते पुन्हा का आले अशा शब्दात राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली होती. यालाच प्रत्युतर देत जरांगे म्हणाले की, दोघे भाऊ चांगले आहेत. ब्रँड चांगला आहे. मात्र काही कारण नसताना राज ठाकरे मराठ्यांच्या प्रश्नांमध्ये पडतो. राज ठाकरे म्हणजे मानाला भुकालेलं पोरगं आहे. त्याच्या घरी फडणवीस चहा पिऊन गेला सगळा पक्ष बरबाद झाला तरी त्याला चालतं. आमच्या खेड्यात याला कुचक्या कानाचं म्हणतात, या शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती.