
Karmala News: MSEDCL Accused of Overcharging Consumers Despite Solar Power Usage
Horror Story: ‘तो’ दरवाजाकडे धावत गेला अन् उडी मारली! अंधेरी स्थानकावर घडलेला भयंकर प्रकार
तालुक्यातील अनेक घरांवर सोलर पॅनल पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असतानाही, प्रत्यक्ष वीज वापर अत्यल्प असताना हजारो रुपयांची बिले ग्राहकांच्या हातात पडत आहेत. काही ठिकाणी तर मीटर रीडिंग न घेता अंदाजे पद्धतीने बिले काढल्याचे आरोप ग्राहक करत आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही महावितरणकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने ग्राहक हतबल झाले आहेत. (Solapur news)
बिले दुरुस्त करून घेण्यासाठी महावितरण कार्यालयात गेलेल्या ग्राहकांशी काही कर्मचारी अरेरावीची व उद्धट भाषेत वागत असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. साध्या चौकशीवरही दमदाटी केली जात असून, ग्राहकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या गंभीर प्रकारांकडे वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र असून, ते ‘मुग गिळून गप्प’असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या भोंगळ कारभाराचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक व मध्यमवर्गीय कुटुंबांना बसत आहे. चुकीच्या व वाढीव बिलांमुळे आर्थिक अडचणी वाढल्या असून मानसिक तणावातही भर पडली आहे. अनेक ग्राहकांना वीजपुरवठा खंडित होईल या भीतीपोटी नाइलाजाने जादा रक्कम भरावी लागत असल्याचे वास्तव समोर येत आहे. (MSEDCL)
करमाळा येथील सोलर वीज ग्राहक तथा करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष पत्रकार दिनेश मडके यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “मी चार महिन्यांपूर्वी नामांकित अदानी कंपनीचे सोलर पॅनल बसवले आहे. सोलर बसवल्यानंतर शून्य बिल येईल, असे आम्हाला सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात मला तब्बल आठ हजार रुपयांचे वीज बिल देण्यात आले. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर जर मागील काही फरक असेल, तर तो भरण्यास आम्ही तयार आहोत. मात्र महावितरणचीच चूक असताना सोलर पॅनलमधून तयार झालेले युनिट्स वजा न करता थेट आठ हजारांचे बिल माझ्या माथी मारले जात आहे. एक जबाबदार ग्राहक म्हणून मला न्याय मिळावा व बिल दुरुस्त करण्यात यावे, अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
महावितरण प्रशासनाने तात्काळ करमाळा तालुक्यातील सोलर ग्राहकांच्या वीज बिलांची स्वतंत्र तपासणी करावी, चुकीची व वाढीव बिले रद्द करून दुरुस्त करावीत तसेच ग्राहकांशी उद्धट वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींकडून होत आहे. अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.