पंढरपूर : सांगोला हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. दुष्काळावर मात करण्यासाठी लोकसहभागातून कासाळ ओढ्याचे पुनर्जीवन केले. ग्रामस्थांच्या या कामामुळे महूदला राष्ट्रीय जल पुरस्कार मिळाला आहे. महूदकरांनी जलक्रांतीसाठी केलेले काम हे राज्यासाठी आदर्श ठरेल, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.
महुद बुद्रुक (ता .सांगोला) येथे शेतकरी परिषद व जलक्रांती करणाऱ्या ग्रामस्थांच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय जलतज्ञ राजेंद्र सिंह, आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, सरपंच संजीवनी लुबाळे, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, डॉ. बाबासाहेब देशमुख, डाळिंब उत्पादक महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, अभिनेते चिन्मय उदगीरकर, महेंद्र महाजन उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले, महूद येथील ग्रामस्थांनी आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून सामाजिक संस्था, शासनाच्या माध्यामातून कासाळ ओढ्याचे पुनरुज्जीवन केले आहे. महुद गावातील ग्रामस्थांनी एकमेकांच्या सहकार्यातून निधी उभारून ओढ्याचे पुनर्जीवन केल्याने या भागातील पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
डाळिंब, द्राक्ष आदी पिकावर विविध रोगामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच सोलापूर जिल्ह्यामध्ये डाळींबाचे हजारो हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी ८० टक्के क्षेत्रावरील डाळिंब विविध रोगामुळे नष्ट झाले आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी मंत्रिमंडळ व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक लावून डाळिंब पिकाच्या नुकसानीबाबत योग्य निर्णय घेतला जाईल व शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत आवश्यक तो निर्णय घेतला जाईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.
सांगोला तालुक्यात विविध रोगांमुळे डाळिंब पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डाळिंबावरील विविध रोग व समस्यांमुळे डाळिंबाचे क्षेत्र दिवसेंदिवस घटू लागले आहे. यामुळे या भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. शेतीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत असल्यामुळे शेत पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन करून मोठ्या शेती उत्पादन घेतले आहे. सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात जलक्रांती केली असून यापुढे ही जलक्रांती करावी, असे आवाहन आंतरराष्ट्रीय जलतज्ञ राजेंद्र सिंह केले आहे.
सांगोला तालुक्यातील ८० टक्के डाळिंबाचे क्षेत्र बाधित झाले असून, नुकसानग्रस्त डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय मदत द्यावी. डाळिंब रोगावरील संशोधनासाठी सांगोला येथे प्रयोगशाळा काढावी, तसेच सांगोला तालुक्यासाठी शासकीय धान्य गोदाम मंजूर करावे, अशी मागणी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली.
निरा उजवा कालव्यातून कासाळ ओढ्याला पाणी सोडण्यासाठी शासकीय स्तरावर कायमस्वरुपी नियोजन करण्याची मागणी माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी केली. यावेळी कार्यक्रमास ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.