चिपळूण : गेल्या चार-पाच दिवसांपासून येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाशिष्ठीसह शिवनदी देखील दुधडी भरून वाहत आहे. सोमवारी रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे मंगळवारी सकाळी ८.३० वाजता वाशिष्ठी नदीने इशारा पातळी (५.२२ मी. ) ओलांडली आहे. तर शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. आज सकाळी ९.५० वाजता भरती असल्याने प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत.
गेल्या चार-पाच दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे सुदैवाने कोणती मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र काही किरकोळ दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तर सोमवारी शहरात नदीपात्राबाहेर बाजारपुल परिसरात पाणी आल्याने शहरातील काही शाळांमधील विद्यार्थ्याना सुट्टी देण्यात आली. तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची परिक्षा देखील रद्द करण्यात आली. दिवसभर पावसाची संततधार सुरू राहिल्याने वाशिष्ठीच्या पाणी पातळीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात आले होते. कुंभार्ली घाटातील वळणावर सोमवारी दरड कोसळण्याची घडना घडली, मात्र काही वेळातच ती हटवण्यात आल्याने वाहतूकीवर त्याचा परिणाम झाला नाही.
दरम्यान सोमवारी रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे वाशिष्ठीसह शिवनदी दुथडी भरून वाहत आहे. विशेष म्हणजे वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. प्रशासन अलर्ट मोडवर असून प्रांताधिकारी आकाश लिगाडे, मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यासह अन्य अधिकारी व एनडीआरएफच्या पथकाकडून पाहणी केली जात आहे.
दरम्यान प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी ८.३० वाजता सध्या वशिष्ठी नदीची पाणी पातळी ५ः२२ मी म्हणजेच इशारा पातळीवर आहे. कोळकेवाडी धरणाची पाणी पातळी १३३.५० मी. आहे. कोळकेवाडी धरणाच्या परिसरात काल सकाळी ८ पासून आज ८ पर्यंत म्हणजे २४ तासामध्ये २२० मिमी पाऊस पडलेला आहे. आज सकाळी ८ ते ८ः३० यावेळेत १५ मिमी पाऊस पडलेला आहे. सर्व मशीन बंद केलेल्या आहेत. सकाळी ९ः५० वा भरती आहे. पुढील दीड तास महत्त्वाचा आहे.. ११ ठिकाणी नगरपालिका, महसूल, पोलीस व NDRF यांची पथके ठेवण्यात आलेली आहेत. ५ ठिकाणी बोटी ठेवण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. जगबुडी नदीची पातळी ७ वरून ६.८० मी वर आलेली आहे ही बाबदेखील आपल्याला दिलासादायक आहे. आता पावसाचा जोर देखील कमी आहे फक्त भरती ९ः५० वा असल्याने पुढील दीड तास महत्त्वाचा आहे. तेव्हा नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.