रायगड : राज्यात गोकुळाष्टमीपासून पावसाचा जोर कायम आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकण विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. सतत सुरु असलेल्या या पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालेले आहेत. अशातच आता रायगड जिल्ह्याला पुढील 48 तास अतीतटीचे सांगितले आहेत, त्यामुळे गरज असेल तरंच घराबाहेर पडा असं आवाहन जिल्हाप्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
हवामान खात्याने रायगड जिल्ह्यासाठी पुढील 48 तासांसाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे.त्या म्हणाल्या की, नागरिकांनी शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. आपल्या परिसरात कोणताही धोका निर्माण झाल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा. तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.
मंत्री तटकरे यांनी पावसाच्या सद्यस्थितीचा स्वतः सातत्याने आढावा घेत असल्याचे सांगितले. म्हसळा, श्रीवर्धन, रोहा, माणगाव, तळा या तालुक्यांतील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना मदत यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, नुकसानग्रस्त भागांमध्ये तातडीने पंचनामे करून मदतकार्य सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
म्हसळा तालुक्यातील पांगलोळी नदीला आलेल्या पुरामुळे गावातील घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले आहे. ही माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.“रायगड जिल्हा प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनास सहकार्य करावे. कोणताही धोका जाणवल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा,” असे आवाहन अदिती तटकरे यांनी केले आहे.