कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी तुरुंगात असलेला प्रशांत कोरटकर आज अखेर तुरुंगाबाहेर आला आहे. कोर्टाने त्याला दोन दिवसांपूर्वी जामीन मंजूर केला होता. दरम्यान आज प्रशांत कोरटकर कळंबा तुरूंगाबाहेर आला आहे. प्रशांत कोरटकरने नागपूरपर्यंत सुरक्षा देण्याची विनंती पोलिसांकडे केली होती. मात्र कोल्हापूर पोलिसांनी त्याला केवळ जिल्ह्याच्या सीमेपर्यन्त सुरक्षा दिली. मात्र कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरला दिलेली स्पेशल वागणूक हा चर्चेचा विषय ठरला आहे.
प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यप्रकरणी राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान आज कोरटकर तुरुंगाबाहेर आला. कोर्टाने त्याला जामिन दिल्याने आज तो तुरुंगाबाहेर आला. कोल्हापूर पोलिसांनी त्याला जिल्ह्याच्या सीमेपर्यंत सुरक्षा पुरवली. प्रशांत कोरटकरची सुटका होणार असल्याने आज पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. मात्र कोरंटकरला पोलिसांनी राजेशाही थाटात निरोप दिल्याची चर्चा सुरू आहे. यासाठी माध्यमांच्या गाड्या देखील पोलिसांनी अडवून ठेवल्या होत्या असे म्हटले जात आहे.
प्रशांत कोरटकरची सुटका करण्यासाठी पोलिसांनी काळ्या फिल्म असलेल्या गाडीचा वापर केल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत कोल्हापूर पोलिस अधीक्षक आणि प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्याचे देखील म्हटले जात आहे. काळ्या रंगाच्या काचा असलेले वाहन वापरायला बंदी असताना देखील त्या वाहनस परवानगी कोणी दिली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आरोपीला सोडताना पोलिसांनी राजेशाही थाट वापरला असा आरोप आणि चर्चा कोल्हापुरात सुरू झाली आहे.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाने जामिन मंजूर केला होता. प्रशांत कोरटकर न्यायालयीन कोठडीत होता. त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर निर्णय देताना कोल्हापूर कोर्टाने त्याला जामिन मंजूर केला आहे. प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक करण्यात आली होती. आधी 3 दिवस व नंतर 2 दिवस अशी कोर्टाने त्याला पोलिस कोठडी सुनावली होती.
पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला कोल्हापूर कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर कोरटकरणे जामिन मिळवण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने अखेर काही अटी-शर्तीसह जामिन मंजूर केला आहे.
वकील असीम सरोदेंची प्रतिक्रिया
प्रशांत कोरटकरला जामिन मंजूर व्हावा अशाच प्रकारची कलमे लावण्यात आली होती. गुन्हा नोंदवताना तीन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा नसलेली कलमे असल्यामुळे साधारणतः अशा प्रकरणात जामिन होत असतो. जामिन देताना कोणती कारणे लक्षात घेतली आहेत ते पाहणे महत्वाचे ठरेल. प्रशांत कोरटकरला जामिन देताना दिलेल्या नियमांचे पालन न् केल्यास आम्ही त्याचा जामिन रद्द करण्यासाठी प्रक्रिया सुरू करू.