कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीतील पराभवनानंतर महाविकास आघाडीला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. दिवसेंदिवस अनेक मोठे नेते महाविकास आघाडीची साथ सोडताना दिसत आहे. अशातच कोल्हापुरातूनही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कागलचे माजी आमदार संजय घाटगे आणि गोकुळ दूध संघाचे संचालक अंबरिष घाटगे आज (१५ एप्रिल) दुपारी ३ वाजता मुंबईतील भाजप कार्यालयात अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
त्याचबरोबर कोल्हापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर आणि महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव हेही उपस्थित राहणार आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर दौरा केला होता. त्या दौऱ्यावेळी त्यांनी संजय घाटगे यांना “तुम्ही भाजपमध्ये या, आम्ही तुम्हाला पूर्ण ताकद देऊ,” असे आश्वासन दिले होते. त्यानंतर घाटगे यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेतील आठ लाख महिलांना दणका; १५०० ऐवजी फक्त ५०० रूपयेच मिळणार
विधानसभा निवडणुकीवेळी कोल्हापुरातील राजकारण चांगलेच चर्चेत होते. पण आता घाटगे पिता-पुत्रांच्या भाजप प्रवेशामुळे कागल तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरू असतानाच संजय आणि अंबरिष घाटगे यांनी भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश करणे, ही त्याच दिशेने एक महत्त्वपूर्ण घडामोड मानली जात आहे. याशिवाय, घाटगे कुटुंबीयांची सध्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी असलेली जवळीकही या घडामोडीला आणखी रंगतदार बनवत आहे.
1998 साली झालेल्या निवडणुकीतून संजय घाटगे यांनी राजकीय जीवनात प्रवेश केला. या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांच्याकडून त्यांचा पराभवाची चव चाखवली होती. मात्र, त्यानंतरच्या सलग पाच विधानसभा निवडणुकांमध्ये – 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्ये – हसन मुश्रीफ यांनी संजय घाटगे यांच्यावर मात केली.
संजय घाटगे यांनी शिवसेना या पक्षाच्या तिकिटावर चार वेळा निवडणूक लढवली. यासोबतच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडीकडून निवडणूक लढवली होती.
विविध निवडणुकांमध्ये वेगळी भूमिका
संजय घाटगे यांनी त्यांच्या राजकीय प्रवासात अनेकदा वेगवेगळ्या भूमिका घेतल्या. त्यांच्या भूमिकांचीही नेहमी चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेतला होता. परंतु काही महिन्यांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांच्या बाजूने काम केले. त्यांच्या या बदलत्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा आणि तर्कवितर्क सुरू झाले. अखेर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.