
उन्हाळ्यात वणवा लागण्याच्या प्रकारात होते वाढ
सध्या फेब्रुवारी ते मे अखेर या महिन्यात वणवे लागण्याचे प्रकार सतत घडत आहेत. निसर्गातील असमतोल जंगलातील वणव्यांना निमित्त ठरत असून उन्हाळ्यात वणवा लागण्याच्या प्रकारात वाढ होताना पाहावयास मिळत आहे. वणवे टाळण्यासाठी शासनस्तरावर जनजागृतीबरोबरच ठोस उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे जंगलात निर्माण झालेले शुष्क वातावरण है आगीच्या तीव्रतेला हातभार लावण्यास कारणीभूत ठरत आहे त्याचबरोबर विविध ठिकाणी विकृत मानसिकतेपोटी लागणारे, लावले जाणारे वणवे ही पर्यावरणासमोरील खूप मोठी समस्या बनली आहे. वणव्यामुळे अनेक पक्षी त्याची घरटी, सरपटणारे प्राणी, सूक्ष्म जीव यांची मोठ्या प्रमाणात होणारी जीवितहानी, फळझाडे, बहुगुणी वनौषधी जळून खाक होते, ही मोठी चिंतेची बाब आहे. शिवाय ज्या परिसरामधे वणवा लागतो, तेथील जमीन जैवविविधतेच्या दृष्टीने पुर्नस्थापित होण्यासाठी बराच कालावधी जावा लागतो. त्यामुळे जंगले विरळ होत चालली आहेत.
वनवे रोखण्यासाठी ग्रामस्तरावर युवकांमध्ये प्रबोधन होणे गरजेचे आहे, त्यामुळे वनवे कसे रोखावे, काय उपाययोजना करावी लागेल, याबाबत माहिती मिळून वनवे रोखण्यासाठी मदत होणार आहे, असं रणजीत यादव अध्यक्ष राजनंदिनी फाऊंडेशन महसवे यांनी सांगितलं.
जनजागृती करणे गरजेचे
प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा घेऊन वृक्षवली अभियान, वृक्षसंवर्धन मार्गदर्शन, स्थानिक युवकांना वणवा विज्ञावण्याचे प्रशिक्षण देऊन वणवा विरोधी पथक आदी पर्यायाबरोबरच निसर्गप्रेमी, वन्यजीवप्रेमी, पर्यावरणप्रेमी यांनी पुढे येऊन जनजागृती करणे गरजेचे आहे, तरच वर्तमान प्रदूषित वातावरणात सर्वांनाच मोकळा श्वास घेता येईल आणि जंगलातील होणारी हानी थांबेल. ‘वणवामुक्त गाव’ संकल्पना शासनामार्फत राबवावी या संकल्पनेसाठी सामाजिक संस्था, कार्यकर्ते तरुण मंडळ यांनी सहभागी व्हावे, अशीही मागणी राजनंदिनी फाउंडेशनने केली आहे.